अलिबाग, प्रतिनिधी

रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. विधान परिषदेच्या सदस्यपदाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी करण्याचे संकेत दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला शेकापची साथ मिळणार असल्याचे जवळपास निश्चित असल्याने त्यांच्या लोकसभा निवडणुकीतील मोठा अडसर दूर होणार आहे. काँग्रेसने मात्र तटकरे यांच्या उमेदवारीला विरोध करीत या मतदारसंघावर दावा केला आहे.

सुनील तटकरे यांच्याकडील प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी काढून ती जयंत पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली, तर तटकरे यांच्यावर पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदाची जबाबदारी टाकण्यात आली. या दोन पक्षांतर्गत बदलानंतर सुनील तटकरे यांना यापुढील काळात राष्ट्रीय स्तरावर सक्रिय केले जाईल असे संकेत मिळत होते.

नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीनंतर स्वत: तटकरे यांनी या गोष्टीला पुष्टी दिली. सहा महिन्यांच्या कार्यकाळासाठी विधान परिषदेवर न जाता, रायगड मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीची तयारी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे रायगड मतदारसंघातून शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होणे अपेक्षित असणार आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस आणि शेकापचा पारंपरिक मतदारसंघ राहिला आहे.

मतदारसंघातून आलटून पालटून दोन्ही पक्षांचे उमेदवार विजयी होत आले आहेत. मात्र शिवसेनेच्या अनंत गीते यांनी ही पंरपरा खंडित केली आहे. सलग दोन वेळा ते मतदारसंघातून निवडून आले आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघावर हक्क सांगत निवडून लढवली होती. सुनील तटकरे यांचा अवघ्या अडीच हजार मतांनी पराभव झाला होता. शेकापच्या उमेदवाराने या निवडणुकीत सव्वा लाख मते मिळवली होती. या अटीतटीच्या लढतीत तटकरे यांना रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीची मोठी मदत झाली होती. अलिबाग मतदारसंघातून मधुकर ठाकूर यांनी, तर पेण मतदारसंघातून रविशेठ पाटील यांनी तटकरे यांना मताधिक्य मिळवून दिले होते.

या मदतीची परतफेड म्हणून विधानसभा निवडणुकीत सहकार्य करण्याचे आश्वासन तटकरे यांनी दोन्ही नेत्यांना दिले होते. मात्र, हा शब्द त्यांनी पाळला नाही. याचा परिणाम म्हणून पेणमधून रविशेठ पाटील यांचा तर अलिबागमधून मधुकर ठाकूर यांचा पराभव झाला. त्यामुळे तटकरे यांना आता खिंडीत गाठण्यासाठी रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीने हालचाली सुरू केल्या आहेत. याचा प्रत्यय रविवारी अलिबाग येथे झालेल्या काँग्रेस मेळाव्यात आला.

रायगड लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे. मतदारसंघात काँग्रेसची दीड ते दोन लाख  मते आहेत. माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांनी रायगड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेस पक्षानेच लढवावी. पक्षाकडे उमेदवार नाही, असा कांगावा इतर राजकीय पक्षांकडून केला जात आहे. पक्षाने उमेदवारी दिल्यास आपण स्वत: ही निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांमधील मतभेद पुन्हा उघड झाले आहेत. आपले राजकीय वजन वापरून सुनील तटकरे हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरात पाडून घेतील. पण जिल्ह्यतील दोन प्रमुख काँग्रेस नेत्यांचा विरोध त्यांच्या वाटचालीत अडथळे निर्माण करू शकेल हे नक्की.

काँग्रेस नेत्यांना भाजप-शिवसेनेचे वेध

पेणमधून रविशेठ पाटील भाजपच्या संपर्कात असल्याच्या, तर मधुकर ठाकूर हे सातत्याने अनंत गीते यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र दोघांनीही याबाबत कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शेकाप अशी राज्यस्तरीय आघाडी झाली तर दोन्ही नेते आपल्या पदाधिकाऱ्यांसह पुढील राजकीय निर्णय घेऊ  शकतात. जिल्हा परिषद निवडणुकीत दोघांनी घेतलेल्या ताठर भूमिकेमुळे जिल्ह्यात शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी आघाडी होऊ  शकली नव्हती. याउलट अलिबाग आणि पेण मतदारसंघात काँग्रेसने शिवसेनेशी जुळवून घेण्याचे धोरण स्वीकारले होते. त्यामुळे काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी या मागणीला किती गांभिर्याने घेतात, यावर पक्षातील नेत्यांची पुढील वाटचाल अवलंबून राहणार आहे.