स्मशानभूमीवरून चंद्रपूर महापालिकेत काँग्रेस विरुद्ध काँग्रेस
वडगाव येथे स्मशानभूमीसाठी बजेटमध्ये १० लाखाची तरतूद केल्यानंतरही बांधकाम केले नाही म्हणून या प्रभागाच्या कॉंग्रेसच्या नगरसेविका सुनिता लोढीया यांनी सर्वसाधारण सभेत चंद्रपूर पंचशताब्दी महोत्सवावर ७५ लाखाची उधळपट्टी केल्याच्या मुद्यावर चांगलीच चिरफाड केली. सभागृहात कॉंग्रेस विरुध्द कॉंग्रेस, असे चित्र बघायला मिळाले.
महापालिकेने बजेटमध्ये विविध प्रभागात घेण्यात येणाऱ्या विकास कामांची यादी गेल्या वर्षी जाहीर केली होती, तसेच त्यासाठी बजेटची तरतूदही केली होती. यात वडगाव प्रभागात स्मशानभूमीसाठी १० लाखाची तरतूद होती, परंतु पंचशताब्दीच्या माहौलमध्ये वडगाव येथे निधी मंजूर केल्यानंतरही स्मशानभूमीचे बांधकाम झाले नाही. काल सोमवारी सभापती रामू तिवारी यांनी स्थायी समितीत मनपाचे बजेट सादर केले. यानंतर आज सर्वसाधारण सभा झाली. या सभेला सुरुवात होत नाही तोच कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेविका सुनिता लोढीया यांनी महापौर संगीता अमृतकर, सभापती रामू तिवारी, मनपा आयुक्त प्रकाश बोखड व गट नेते संतोष लहामगे यांना चांगलेच धारेवर धरले. वडगाव प्रभागात स्मशानभूमीसाठी निधीची तरतूद असतांना बांधकाम का झाले नाही, असे म्हणून चिरफाड करायला सुरुवात केली. शहरात पंचशताब्दी महोत्सवाच्या नावाखाली ७५ लाखाची उधळपट्टी करण्यात आली. याच पैशात किमान सहा ते सात प्रभागात विकास कामे घेता आली असती. त्याऐवजी कुस्ती, कबड्डी, क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल या स्पर्धासोबत कव्वाली व डॉग शो सारख्या फालतू कार्यक्रमांचे आयोजन केले म्हणून चांगलीच आगपाखड केली.
सभागृहात एका बाजूला सुनिता लोढीया, तर दुसऱ्या बाजूला कॉंग्रेसचे सर्व नगरसेवक, असे चित्र बघायला मिळाले. लोढीया यांनी उपस्थित केलेल्या मुद्याला महापौर, सभापतीपासून, तर गटनेते व नगरसेवकालाही उत्तर देता आले नाही. यावेळी लोढीया यांनी स्मशानभूमीला निधी मंजूर आहे की नाही, अशी विचारणा आयुक्त बोखड यांना केली असता त्यांनी होकारार्थी उत्तर देताच त्या आणखी भडकल्या. शहरात विकास कामे करण्याऐवजी कव्वाली, कबड्डी व क्रिकेट खेळल्या जात आहे. हा नेमका कोणत्या प्रकारचा विकास आहे, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. एकूणच सभागृहात कॉंग्रेस विरुध्द कॉंग्रेस, असे चित्र येथे बघायला मिळाले. विशेष म्हणजे, लोढीया यांनी पंचशताब्दीत घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांची मुद्देसूद अक्षरश: चिरफाड केली, तसेच पंचशताब्दीवर करण्यात आलेल्या खर्चाचा हिशेब योग्य पध्दतीने सादर केला नाही, यावरही त्यांनी आक्षेप नोंदविला.
यासोबतच वैद्यकीय महाविद्यालयासाठी महापालिकेने कोलबेल्टचे आरक्षण हटविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. मात्र, या परिसरातील लोकांना त्याचा लाभ होत नसल्याची बाब उपमहापौर संदीप आवारी यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर परिसरातील नागरिकांनाही कोलबेल्ट मुक्त करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. आरोग्य विभागाच्या दुर्देशेवरून नगरसेविका वनश्री गेडाम, भोयर, जोगेकर या नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना आडव्या हाताने घेतले. इंदिरानगर, तसेच बहुतांश प्रभागातील आरोग्य केंद्रांचे दरवाजे-खिडक्या गायब आहेत, कुत्रे, गायी, म्हशी व मोकाट जनावरांचे ते राहण्याचे ठिकाण झाले आहे. त्याची दुरुस्ती करण्याची मागणी लावून धरली. यावर आयुक्तांनी तात्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश दिले.
राष्ट्रवादीचे गटनेते संजय वैद्य यांनी कचरामुक्त शहर व प्राथमिक शाळांची पटसंख्या वाढविणाऱ्या शिक्षकांना पुरस्कृत करण्याचा विषय चर्चेला आणला. त्यावर घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याचा निर्णय झाला. त्याचे पैसे वार्षिक करात जोडण्याची सूचना केली. झोपडपट्टीतील लोकांकडून १०, तर मध्यमवर्गीयांकडून २५ रुपये गोळा करण्यात येणार आहे. यासोबतच शाळेत विद्यार्थी आणणाऱ्या शिक्षकांना ५ सप्टेंबर शिक्षक दिनी उत्कृष्ट शिक्षकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. आरोग्य विभागात पाच चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची परस्पर भरती केल्याच्या विषयावर रणकंद माजले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय महापौर संगीता अमृतकर व आयुक्त बोखड यांनी घेतला. याशिवाय, आजच्या सभेत अन्य विषयही चर्चेला आले.