|| प्रबोध देशपांडे

अतिविशेषोपचाराच्या मूळ उद्देशालाच छेद

अकोला : वैद्यकीय शिक्षण विभागाने शहरातील ‘सुपर स्पेशालिटी’च्या इमारतीत करोना  रुग्णालय सुरू करण्याला मंजुरी देऊन अतिविशेषोपचाराच्या मूळ उद्देशालाच छेद दिला.  ‘सुपर स्पेशालिटी’ची इमारत गत दोन वर्षांपासून धूळ खात पडून होती. आता पदांची निर्मिती झाल्याने पदभरती होऊन ‘सुपर स्पेशालिटी’ रुग्णालय सुरू होण्याच्या आशा बळावल्या असताना त्याची कोविड रुग्णालयावर बोळवण करण्यात आली. त्यामुळे इतर गंभीर व्याधिग्रस्त रुग्ण वाऱ्यावरच असून अद्यापही त्यांना उपचाराची प्रतीक्षाच आहे.

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेच्या फेज-तीन अंतर्गत अकोला, यवतमाळ, लातूर आणि औरंगाबाद वैद्यकीय महाविद्यालयात सुपर स्पेशालिटी रुग्णालयाला मान्यता मिळाली. यासाठी प्रत्येकी १५० कोटींचा निधी मिळाला. त्यापैकी १२० कोटी केंद्र तर ३० कोटी राज्य शासनाचा वाटा आहे. अकोल्यातील इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन साधारणत: दोन वर्षांचा कालावधी झाला. चारही जिल्ह्यातील रुग्णालयांसाठी सुसज्ज इमारतींसह यंत्रसामुग्री उपलब्ध आहे. ‘सुपर स्पेशालिटी’ रुग्णालय सुरू करण्यासाठी पद निर्मितीचा सर्वात मोठा अडथळा होता. अकोला येथील रुग्णालयासाठी १ हजार १६ पदांचा आकृतिबंध तयार करून वैद्यकीय शिक्षण संचालनालयाकडे सादर करण्यात आला होता. साधारणत: अडीच वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटल्यावर ८ जानेवारी २०२१ ला वैद्यकीय शिक्षण विभागाने शासन निर्णय काढून केवळ ८८८ पदांना मंजुरी दिली. यामध्ये अकोला, यवतमाळ व लातूर येथील रुग्णालयासाठी प्रत्येकी २२३, तर औरंगाबादसाठी २१९ पदांची निर्मिती केली. यामध्ये गट अ – ३४, ब – ३८, क – ३८८, बाह्यस्रोत गट क – २८, गट ड – ३४४, वरिष्ठ निवासी – ५६ अशा एकूण ८८८ पदांचा समावेश आहे. शासनाने पहिल्या टप्प्यात निम्म्यापेक्षाही कमी पदांची निर्मिती केल्याने ‘सुपर स्पेशालिटी’ रुग्णालय सुरू होण्यावर प्रश्नचिन्ह लागले होतेच.

औरंगाबाद, यवतमाळ व लातूर जिल्ह्यात सुपर स्पेशालिटीसाठी उभारलेल्या इमारतीचा लाभ कोविडच्या पहिल्या लाटेपासून करोना रुग्णालयासाठी करण्यात आला. इच्छाशक्तीचा अभावाने अकोल्यात मात्र कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेली इमारत शोभेची वास्तू, तर यंत्रसामुग्री धूळखात पडूनच आहे. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात करोना केंद्र सुरू असल्याने ‘सुपर स्पेशालिटी’मध्ये कोविड रुग्णालय सुरू करण्याची गरज भासली नव्हती. आता रेटा वाढल्याने वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी अकोल्यातील त्या इमारतीत कोविड रुग्णालय सुरू करण्याला मंजुरी दिली. वास्तविक पाहता अकोल्यात ‘सुपर स्पेशालिटी’ रुग्णालय सुरू होण्याची नितांत गरज आहे. करोना रुग्णांसाठी सर्वोपचार रुग्णालयात ४५०, कृषी विद्यापीठातील जम्बो कोविड केंद्रात २०० व इतर करोना केंद्रातही मोठ्या संख्येने खाटा उपलब्ध करून उपचाराची सोय आहे. प्राणवायूदेखील आवश्यकतेनुसार उपलब्ध होत असून व्हेंटिलेटरची मात्र कमतरता भासते. व्हेंटिलेटरअभावी अनेक गंभीर रुग्णांचे जीव गेले. सध्या आरोग्य विभागाने करोनाबाधितांवरील उपचारात संपूर्ण लक्ष केंद्रित केल्याने इतर व्याधिग्रस्तांचे चांगलेच हाल होत

आहेत. त्यांच्यावर उपचार दुरापास्त झाले आहेत.

‘सुपर स्पेशालिटी’ रुग्णालय सुरू झाले असते, तर गंभीर व्याधिग्रस्त रुग्णांवर अतिविशेषोपचार झाले असते. गंभीर करोनाबाधित रुग्णांवरही त्या ठिकाणी विशेष उपचार करून जीव वाचवता आला असता. मात्र, पदभरतीच झाली नसल्याने ‘सुपर स्पेशालिटी’ रुग्णालय सुरू होण्याचा प्रश्न अधांतरी लटकला आहे. आता २५० खाटांचे कोविड रुग्णालय सुरू करण्याला मंजुरी देऊन वेळ मारून नेण्यात आली. कोविड रुग्णालय सुरू करण्यासाठी देखील अत्यावश्यक सोयीसुविधा इमारतीत उपलब्ध नाही. त्यासाठीसुद्धा अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ‘सुपर स्पेशालिटी’ रुग्णालयात कार्डिओलॉजी, कार्डिओ व्हॅस्क्युलर थोरॅसिक सर्जरी, न्यूरोलॉजी, न्यूरोसर्जरी, नेफ्रॉलॉजी, प्लास्टिक सर्जरी, बर्नस आदी विभाग प्रस्तावित आहेत. या विभागांसाठी अकोला, लातूर व यवतमाळसारख्या शहरांमध्ये तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध होणे अत्यंत अवघड मानले जात आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून ‘सुपर स्पेशालिटी’ रुग्णालय उभारल्याने त्या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध करून देण्याची शासनाची जबाबदारी आहे. करोनासारख्या महामारीच्या काळातही शासनाने ती जबाबदारी नीट पार पाडल्याचे दिसून आलेले नाही. गंभीर व्याधिग्रस्तांच्या उपचारात शासनाच्या वेळकाढू धोरण व दिरंगाईचा फटका बसत आहे.

पदभरतीची प्रतीक्षा

‘सुपर स्पेशालिटी’ रुग्णालयांच्या बहुप्रतीक्षित पदनिर्मितीला ८ जानेवारी २०२१ ला वैद्यकीय शिक्षण विभागाने मंजुरी दिली. गरजेच्या तुलनेत निम्मेपेक्षाही कमी पदे निर्माण करण्यात आले. त्या पदभरतीचीही गेल्या चार महिन्यांपासून प्रतीक्षा लागली आहे. लोकसेवा आयोगामार्फत डॉक्टर व अन्य कर्मचाऱ्यांची पदभरती करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाने स्पष्ट केले.

‘सुपर स्पेशालिटी’ रुग्णालयात कोविड रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेणे म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी एक वर्षापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांना कोविड रुग्णालय सुरू करण्याचे आदेश दिले होते. मात्र, अक्षम्य दुर्लक्ष करून त्यावर कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. आता तुटपुंजी का होईना, पदनिर्मिती केल्याने तात्काळ पदभरती करून ‘सुपर स्पेशालिटी’ रुग्णालय सुरू करणे गरजेचे आहे. त्यामुळे गंभीर व्याधिग्रस्त रुग्णांना दिलासा मिळू शकेल. – आमदार डॉ.रणजित पाटील, माजी पालकमंत्री, अकोला.