सध्या लॉकडाऊन काळात जिल्हाबंदीचेही आदेश लागू करण्यात आलेले आहेत. तरीदेखील अनेकजण पळवाटा काढून तर काही ठिकाणी बंदोबस्तास असलेल्या पोलिसांच्या तावडीतू निसटण्यसाठी, विविध मार्गांचा अवलंब केला जात असल्याचे दिसून येते. या परिस्थितीत उस्मानाबादचे जिल्हा पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांनी  पोलीस कर्मचार्‍यांचे स्टिंग ऑपरेशन करुन त्यांची एकप्रकारे परीक्षाच घेतली. या परीक्षेत पास झालेल्या दोघा पोलिसांना रौशन यांनी बक्षीस देऊ केले आहे.

उस्मानाबाद-सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरील तामलवाडी येथील चेकपोस्टवर पोलीस अधीक्षक रौशन यांनी डमी प्रवासी असलेले वाहन पाठवून तेथे बंदोबस्ताला असलेल्या कर्मचार्‍यांची परीक्षा घेतली. या वाहनातील डमी प्रवाशांनी चेकपोस्टवरील पोलीस कर्मचारी व त्यांच्या मदतीस असलेल्या तुळजाभवानी मंदिरातील सुरक्षा रक्षकांना पैशाचे आमिष दाखवून सोलापूरकडे जाऊ देण्याची विनंती केली. बराचवेळ गयावया केल्यानंतरही बंदोबस्तावरील पोलीस कॉन्स्टेबल सचिन वारे, योगेश कांबळे व त्यांच्यासोबत असलेले मंदिराचे सुरक्षा रक्षक गणेश तांबे, महेश गिरी, शेखर ओहाळ यांनी कर्तव्यदक्ष, प्रामाणिक राहुन त्यांना चेकपोस्ट ओलांडून सोलापूरकडे जाण्यास मज्जाव केला.

चेकपोस्टवरील कर्मचार्‍यांची कर्तव्यदक्षता व प्रामाणिकपणा पाहून पोलीस अधीक्षकांनी दोन्ही पोलीस कर्मचार्‍यांना प्रत्येकी 500 रुपयांचे बक्षीस व तिन्ही मंदीर सुरक्षा रक्षकांना प्रशंसापत्रे दिली आहेत.