निवडणुकीच्या रणमदानात प्रचारासाठी जीवाचे रान केले जाते. उमेदवाराचे नाव आणि चिन्ह मतदारापर्यंत पोहचविण्यासाठी सभा, प्रचारफेरी, भाषणे, भित्तिपत्रके, डिजिटल जाहिराती यांचा मारा करण्याबरोबरच विरोधकांचा पाडाव करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्यांचा वापर करण्यात येतो. मात्र विजयासाठी भानामती करण्याच्या अंधश्रद्धेचा प्रकार शिराळा तालुक्यातील नाटोली परिसरात पाहण्यास मिळाला.

मतदानानंतर रानात विशिष्ट व्यक्तीच्या नावाच्या चिठ्ठय़ा लावून सहा काळ्या बाहुल्या आडरानात टाकलेल्या आढळून आल्याने खळबळ माजली आहे. विरोधकांच्या पराभवासाठी हा अंधश्रध्देचा अघोरी खेळ चालला होता.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, नाटोली-कांदे येथील मसोबा देवळाकडे जाणाऱ्या रस्त्याकडेला असलेल्या शेतात कांदेतील सहा जणांची नावे लिहून सहा काळ्या बाहुल्या टाकण्यात आल्या असल्याचे आढळल्याने खळबळ माजली.

जिल्हा परिषदेसाठी मंगळवारी मतदान झाले, त्याच दिवशी रात्री हा अंधश्रद्धेचा हा खेळ चालला असल्याचे दिसून आले आहे. बुधवारी शेतात जाणाऱ्यांना हा प्रकार लक्षात आला.