डय़ुटी वाटपावरून वाद; एमआयडीसीतील घटना, आरोपी पसार

नगर : एमआयडीसीतील कंपनीत डय़ुटी वाटपावरून झालेल्या वादातून सुरक्षा रक्षकाने सुपरवायजरवर कोयत्याने वार करून त्याचा खून केला तर दुसऱ्या एका सुरक्षा रक्षकावरही प्राणघातक हल्ला केला. राजाराम नामदेव वाघमारे (५०, रा. भिंगार) या सुपरवायजरचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा सुरक्षा रक्षक अनिल छबुराव उमाप (२९, रा. वासुंदे, पारनेर) हा जखमी आहे. तर आरोपी किरण राजाभाऊ लोमटे (रा. देवळाली प्रवरा, राहुरी, सध्या रा. गणेश कॉलनी, बोल्हेगाव, नगर) हा फरार आहे.

याबाबत जखमी सुरक्षारक्षक उमाप यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लोमटे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपअधीक्षक अजित पाटील करत आहेत. आज, गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमाराला एमआयडीसीतील क्रॉम्प्टन कंपनीच्या आवारातील सुरक्षारक्षकाच्या केबिनमध्ये ही घटना घडली. कंपनीने आयसीएस या ठेकेदार कंपनीला सुरक्षारक्षकाचे कंत्राट दिले आहे. सकाळी कंपनीच्या केबिनमध्ये सुपरवायजर वाघमारे डय़ुटी वाटप करत होते. त्यातून त्यांचे व सुरक्षारक्षक लोमटे याच्याशी वाद झाले. लोमटे याने तुझ्याकडे बघून घेतो, अशी धमकी दिली नंतर तो बाहेर केला व कोयता घेऊन आला. केबिनमध्ये बसलेल्या वाघमारे यांच्या मानेवर त्याने कोयत्याने चार ते पाच वार केले. वाघमारे यांचा जागीच मृत्यू झाला.

केबिनमधील दुसरे सुरक्षारक्षक उमाप मध्ये पडले असता लोमटे याने त्यांच्याही डोक्यावर वार करून त्यांच्याही खुनाचा प्रयत्न केला, या घटनेनंतर लोमटे पसार झाला. त्याचा शोध सायंकाळपर्यंत लागलेला नव्हता. त्याच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आल्याचे तपासी अधिकारी पाटील यांनी सांगितले.