News Flash

नक्षल्यांचा घातपातासाठी अतिदुर्गम भागात स्फोटकांचा साठा

उद्या, सोमवारपासून सुरू होण्याऱ्या शहीद सप्ताहाच्या पाश्र्वभूमीवर नक्षलवाद्यांचा मोठय़ा प्रमाणात घातपात घडवून आणण्याचा इरादा असून त्यांनी अतिदुर्गम भागात स्फोटके दडवून ठेवली

| July 27, 2015 04:36 am

उद्या, सोमवारपासून सुरू होण्याऱ्या शहीद सप्ताहाच्या पाश्र्वभूमीवर नक्षलवाद्यांचा मोठय़ा प्रमाणात घातपात घडवून आणण्याचा इरादा असून त्यांनी अतिदुर्गम भागात स्फोटके दडवून ठेवली असल्याची माहिती आहे. किसनेली, पदाबोरीयाच्या जंगलात मोठय़ा प्रमाणात स्फोटके मिळाली असून गडचिरोली जिल्हा पोलिस दलाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पंधरा जहाल नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणानंतर नक्षली चांगलेच संतापले आहेत. या जिल्ह्य़ातील घनदाट अरण्यातून नक्षलवाद पूर्णत: संपविण्यात आम्ही यशस्वी झालो, असे चित्र जिल्हा पोलिस दलाने निर्माण केल्याने स्थानिक आदिवासींच्या मनातील भीती काही प्रमाणात का होईना दूर झाली आहे. नक्षल चळवळ दुबळी झाली, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे उद्या, २७ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीतील शहीद सप्ताहात मोठा घातपात घडवून आणण्याची नक्षल्यांची योजना असल्याची माहिती गुप्तवार्ता विभागाच्या माध्यमातून समोर आली आहे. त्यामुळे अतिदुर्गम परिसरातील जंगलालगतच्या गावात, मुख्य रस्त्यांवर, पूलालगत बारूद व स्फोटके नक्षल्यांनी पेरून ठेवली आहेत. शुक्रवारी उपविभाग धानोरा अंतर्गत पोलिस मदत केंद्र गोडलवाही हद्दीत किसनेली, पदाबोरीया जंगलात गडचिरोली पोलिसांचे विशेष अभियान पथक नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना सशस्त्र बंदुकधारी नक्षल्यांनी पोलिसांना जिवे मारण्याच्या हेतूने दोन डिटोनेटर्स लावून ठेवलेले वायर व बॅटरी इत्यादी साहित्य पोलिसांनी निकामी केले. या परिसरात अधिक शोध घेतला असता सात वायर बंडल, दोन डिटोनेटर्स, नक्षल लाहित्य, वॉकीटॉकी चार्जर, दोन बॅटरी यासह नक्षल्यांनी पेरून ठेवलेली स्फोटके सापडली. दरम्यान, घातपाताचा हा डाव पोलिसांनी उधळून असून या भागात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे. केवळ धानोरा तालुकाच नाही, तर एटापल्ली, अहेरी, भामरागड, सिरोंचा व कोरची या तालुक्यांनाही त्यांनी लक्ष्य केले आहे. हे लक्षात घेता या तालुक्यात पोलिस दलाचे मोठय़ा प्रमाणात सर्चिग ऑपरेशन सुरू आहे. प्रत्येक व्यक्तीची कसून तपासणी केली जात असून ठिकठिकाणी चौक्या उभारून नाकेबंदी करण्यात आलेली आहे. भामरागड तालुका पूर्णत: छत्तीसगडला लागून आहे. या मार्गेच गडचिरोलीत स्फोटके, बारूद, बंदुका व नक्षल्यांचे इतर साहित्य येत आहे. नक्षल्यांच्या प्रत्येक लहानसहान हालचालींवर पोलिस लक्ष ठेवून आहेत. शहीद सप्ताह शांततेत पार पडावा, यासाठी सर्व मुख्य मार्गांवर कडक सुरक्षा यंत्रणा तैनात करून सर्व वाहनांची तपासणी केली जात आहे. लोकांना जेथे कुठे संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिस दलाला माहिती द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे. अहेरी व सिरोंचा तालुक्यातील कमलापूर, झिंगानूर परिसरात शहीद सप्ताहाचे मोठय़ा प्रमाणात कापडी बॅनर्स सापडले आहेत. नक्षली कापडी बॅनरबॉम्ब लावून स्फोट करत असल्याचा इतिहास असल्याने गावकऱ्यांनी हे बॅनर्स काढतांना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन गडचिरोली जिल्हा पोलिस दलाने केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2015 4:36 am

Web Title: supply explosives to maoists in jungle
Next Stories
1 नाशिकमध्ये एम.जी रोड परिसरात संशयास्पद वस्तू आढळल्याने घबराट
2 पंढरीत दहा लाख वारक-यांचा दळभार
3 राज्य सरकार ट्विटरवर चालते- तटकरे
Just Now!
X