01 June 2020

News Flash

टंचाईच्या झळा वाढल्या; ८४ टँकरने पाणीपुरवठा

बिले थकल्याने खासगी टँकर पुरवठाधारकांपुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत.

संग्रहित छायाचित्र

गेल्या वर्षीच्या तुलनेत जिल्ह्य़ातील लहानमोठय़ा धरणांतून अधिक पाणीसाठा असला तरी उन्हाच्या कडाक्याबरोबरच जिल्ह्य़ातील पाणी टंचाईच्या झळयात वाढ होऊ लागली आहे. जिल्ह्य़ातील सुमारे दीड लाख लोकसंख्येला ८४ टँकरमार्फत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. शहरी भागापैकी केवळ जामखेड शहरात टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

बिले थकल्याने खासगी टँकर पुरवठाधारकांपुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत. नगर तालुक्यात पाणी पुरवठा करणाऱ्या टँकर चालकाने यापूर्वीचे बिल अदा न झाल्यास टँकर थांबवण्याचा इशारा दिला आहे, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांच्या मध्यस्थीनंतर पुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला आहे. दि. ३१ मेपर्यंत बिल अदा करण्याचे आश्वासन पंचायत समितीने दिले आहे. इतरही तालुक्यात असे प्रसंग उद्भवू लागले आहेत.

गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने मार्चपासून टँकरची मागणी होऊ लागली. अन्यथा जानेवारी-फेब्रुवारीपासून मागणी होऊ लागते. जिल्ह्य़ात सध्या ७५ गावे, २९६ वाडय़ावस्त्यांवरील १ लाख ४९ हजार ७२९ नागरिकांना ८४ टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो आहे. कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी व राहाता या चार तालुक्यांतून अद्याप टँकरची मागणी नाही. संगमनेर ९, अकोले २, नेवासे १, नगर १२, पारनेर १८, पाथर्डी २, शेवगाव ४, कर्जत व जामखेड प्रत्येकी ११ व श्रीगोंदे ६ असे ग्रामीण भागात ७६ व जामखेड शहरात ८ टँकरने पुरवठा सुरू आहे.

जिल्ह्य़ात मोठय़ा प्रकल्पांपैकी भंडारदरा धरणात ४२.११ टक्के, मुळा ३६.५२, निळवंडे ३६.५५ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी तो नगण्य राहिला होता. मध्यम प्रकल्पांपैकी आढळामध्ये ४५ टक्के, मांडओहळमध्ये २६.७९, घाटशिळ पारगाव १०.३०, सीना २२.२७, खैरी ९.७३ व विसापूरमध्ये २३.९४ टक्के पाणीसाठा आहे.

नगर शहरात १२ टँकर

याशिवाय नगर शहरात वर्षभरापासून १२ टँकरच्या सरासरी ४ या प्रमाणे ४८ खेपा करून सारसनगर, कल्याण रस्ता, काटवन खंडोबा, गाझीनगर परिसरातील झोपडपट्टी, रेल्वेस्टेशन परिसर या भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. नगर शहरातील हे टँकर उन्हाळ्यामुळे नाही तर या भागात मनपाने जलवाहिन्या न टाकल्याने वर्षभर सुरूच असतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2020 12:44 am

Web Title: supply of drinking water to about one and half lakh population of the ahmednagar district through 84 tankers abn 97
Next Stories
1 अकोला तालुक्यात करोनाचा पहिला रुग्ण
2 लातूरमध्ये करोनाचे ७९ रुग्ण
3 दारूच्या नशेत मित्राचा खून, एकास अटक
Just Now!
X