X
Advertisement

मान्यताप्राप्त रुग्णालयांना थेट रेमडेसिविरचा पुरवठा

 जिल्ह्यात आठ लाख ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे नागरिक करोना लसीकरणासाठी पात्र आहेत.

|| प्रदीप नणंदकर

लातूर : करोना रुग्णांचा वाढता आकडा राज्यभर आहे. रुग्णांची रेमडेसिविरची गरज वाढलेली आहे. त्यामुळे राज्यभरच तुटवडा आहे. शहरातील कोणत्याही औषधालयापेक्षा ज्या मान्यताप्राप्त खासगी रुग्णालयात कोविड रुग्णांचा उपचार होतो तेथे थेट रेमडेसिविरचा पुरवठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जे याचे उल्लंघन करतील त्यांच्यावर रीतसर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दिला.

मिनी टाळेबंदीसंबंधी शासनाच्या आलेल्या सूचना, नागरिकांच्या अडचणी, त्यावरील उपाय यासंबंधी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. करोनाची वाढती आकडेवारी ही चिंताजनक असून शासकीय रुग्णालयात दाखल असणाऱ्या रुग्णांना आवश्यक तो  रेमडेसिविरचा पुरवठा उपलब्ध आहे. रुग्णच डॉक्टरांकडे रेमडेसिविरचे  इंजेक्शन देण्याचा आग्रह धरत आहेत. गरज नसताना हे इंजेक्शन घेतल्याने त्याचे दुष्परिणामही होतात, असे सांगत रुग्णांची गरज लक्षात घेऊन खासगी रुग्णालयाकडे अधिकाधिक इंजेक्शन थेट पुरवण्याची यंत्रणा कार्यान्वित केली जाणार असल्याचे ते म्हणाले.

जिल्ह्यात आठ लाख ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे नागरिक करोना लसीकरणासाठी पात्र आहेत. त्यापैकी एक लाख २० हजार जणांचे लसीकरण झाले आहे. लसीकरणाची अधिक केंद्रे वाढवावीत यासाठी प्रशासन पातळीवर प्रयत्ना केला जात आहेत. जि. प.च्या प्राथमिक केंद्रापर्यंत लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. त्यानंतर उपकेंद्रापर्यंत व त्याचा  पुढील टप्पा मोठ्या गावापर्यंत गरज पडल्यास शाळेची इमारत ताब्यात घेऊन, वार निश्चित करून लसीकरणाची सोय केली जाणार आहे. लातूर महानगरातील प्रत्येक प्रभागात लसीकरण केंद्र सुरू करण्याचा प्रयत्ना आहे. लसीकरणाची गती वाढवावी, यासाठीचे नियोजन केले जात असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. लातूर व्यापारी महासंघाच्यावतीने दुकाने उघडी ठेवू द्यावीत यासाठीचे निवेदन शिष्टमंडळाने दिले आहे. मात्र, करोनाचा वाढता आकडा लक्षात घेता ही मागणी मान्य करणे अवघड असल्याचे ते म्हणाले. बांधकाम व्यवसायाच्या अनुषंगिक दुकाने व वाहन दुरुस्तीची दुकाने सुरू करण्यासंबंधी राज्याकडून येणाऱ्या मार्गदर्शक तत्त्वाची वाट पाहत असल्याचे त्यांनी सांगितले.

23
READ IN APP
X