करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनची घोषणा करण्यात आल्यानंतर समाजातील गरीब, हातावर काम असलेल्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. त्यांच्याकडे थोडेफार अन्नधान्य उपलब्ध आहे मात्र दैनंदिन जीवनातील अन्य गरजांची पुर्तता करण्यासाठी पैसे आणायचे कुठून  या समस्येत असलेल्याना, रोख मदत देण्यासाठी देशविदेशातील अभियंते ‘आपुलकी’ संस्थेच्या माध्यमातून पुढे सरसावले आहे.

आपुलकी ही संस्था प्रामुख्याने देशविदेशातील सामाजिक दायित्व जोपासणाऱ्या अभियंत्यांची संघटना आहे. संस्थेच्या माध्यमातून यापूर्वी अडचणीतील व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत देण्यात आली आहे. करोनाच्या संकटात गरीब वर्ग पिचल्या जात असल्याने शासनातर्फे  तसेच स्वयंसेवी संस्थांतर्फे  धान्य व काहीप्रमाणात किराणा वाटप होत आहे. मात्र धान्य मिळाल्यानंतर ते दळण्यासाठी पैसे आणायचे कुठून  असा प्रश्न गरिबांपूढे असल्याचे चित्र पूढे आल्यावर आपुलकी संघटनेने त्यावर लक्ष केंद्रीत केले. शहरातील व गावातील अत्यंत दयनी अवस्थेत असलेल्या ९३ कुटुंबांना प्रत्येकी १ हजार रूपयांची मदत आतापर्यंत देण्यात आली असल्याचे संघटनेचे संयोजक अभिजीत फाळके यांनी सांगितले आहे. चांगल्या कंपनीतील नोकरी सोडून सेवाभावी कार्याला वाहून घेतलेल्या फाळके यांनी समवयीन अभियंत्यांची मोट बांधून विविध उपक्रम अंमलात आणले आहे. विदेशात असणारे पण थेट मदत करण्यास असमर्थ ठरणाऱ्या अभियंत्यांनी या संघटनेच्यामार्फत मदत सुरू केली आहे.

विपूल निलपवार (अमेरिका), ज्ञानेश्वर आघाव व ललीत मोटके (सिंगापूर), गिरिष कांबळे (इंग्लंड), महेंद्र मोहोड (दुबई), संदीप राठोड, शिल्पा चिद्दरवार (अमेरिका), मंगेश ठाकूर, अविनाश महल्ले, हरिष भोयर, विक्रम शिंदे, प्रशांत गाढे, तुषार कारेमोरे, सचिन छतबार, रूपाली मुसळे (सर्व पुणे), गोपाळ रिठे (अमरावती), प्रतिक मेघे,  सुनील कोठवरे,  विवेक लोहकरे,  होमदेव येळणे (सर्व वर्धा) तसेच मुंबईच्या एकाचा मदत देण्यात समावेश आहे.

योग्य व गरजू व्यक्तीपर्यंत ही मदत पोहोचवण्यासाठी आपुलकीचे समीर राऊत, प्रवीण काटकर, योगेश घोगरे, प्रवीण पेठे, दिपक देशमुख, डॉ. कपिल मून, तेजस्वी बारद्दे, रितेश घोगरे व अन्य २५ कार्यकर्त्यांचा चमू कार्यरत आहे. अभिजीत फाळके म्हणाले, सुस्थितीतील अभियंते या कामी पूढे आले असून आणखीही मदत देण्याची त्यांची तयारी आहे. केवळ मजूरीवर जगणाऱ्या परिवारांसाठी ही मदत दिल्या जात आहे.