लातूर लोकसभा मतदारसंघात शेकापचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांनी भाजपला पाठिंबा देण्याची घोषणा गुराखीगड (तालुका लोहा) येथे केली, तसेच विधानसभा निवडणूक शेकाप महायुतीसोबत लढणार असल्याचे जाहीर केले. काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी धोंडगे यांची मंगळवारी त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन काँग्रेसला सहकार्य करण्याची विनंती निष्फळ ठरली.
लातूर लोकसभा मतदारसंघात लोहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. मागील निवडणुकीत विलासराव देशमुख व त्यांचे कट्टर समर्थक माजी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या विरोधात निष्ठावंत काँग्रेसने ‘कमळ’ फुलविले होते. त्याचा काँग्रेस उमेदवार जयवंत आवळे यांना २५ हजार मतांनी फटका बसला होता. तेव्हा मुख्यमंत्रिपदी अशोक चव्हाण होते. आता लातूर-नांदेडचे मनोमिलन झाले आहे.
आमदार अमित देशमुख यांनी मंगळवारी लोहा-कंधार भागाचा दौरा केला. शेकापचे ज्येष्ठ नेते धोंडगे यांची भेट घेऊन काँग्रेसला सहकार्य करण्याची विनंती केली. जि. प. सदस्य प्रा. डॉ. मुक्तेश्वर धोंडगे, प्रभारी डॉ. श्याम पाटील तेलंग, जिल्हा सरचिटणीस संजय भोसीकर या वेळी उपस्थित होते. आमदार देशमुख यांनी माजी आमदार ईश्वरराव भोसीकर, जिल्हा उपाध्यक्ष कल्याण सूर्यवंशी, नगरसेवक वसंत पवार आदींशीही चर्चा केली.
गेल्या आठवडय़ात धोंडगे व खासदार गोपीनाथ मुंडे यांच्यात कंधार-बहाद्दरपुरा येथे बैठक झाली. या वेळी लोकसभा निवडणुकीत शेकापने भाजपला पाठिंबा द्यावा व विधानसभा निवडणुकीत भाजपने अॅड. धोंडगे यांना मदत करावी, असे ठरले. त्यानुसार धोंडगे यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला. १९९९नंतर प्रथमच धोंडगे यांनी राजकीय भूमिका स्पष्ट केली.