News Flash

‘सीएए’ला पाठिंबा पण ‘एनआरसी’ राज्यात लागू होऊ देणार नाही- मुख्यमंत्री

शिवसेनेच्या मुखपत्रासाठी दिलेल्या मुलाखतीतून मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपली भुमिका मांडली.

उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याला (सीएए) पाठिंबा दर्शवला आहे. तर, राष्ट्रीय नागरिक नोंदणीला (एनआरसी) विरोध. तसेच एनआरसी महाराष्ट्रात लागू होऊ देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेनेच्या मुखपत्रासाठी दिलेल्या मुलाखतीतून त्यांनी आपली भुमिका मांडली.

राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारचे मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे यांची शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपण संपादक असलेल्या शिवसेनेच्या मुखपत्रासाठी मुलाखत घेतली. या मुलाखतीत बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणतात, “सीएएमुळे देशातील कोणत्याही नागरिकाची नागरिकता हिसकावून घेतली जाणार नाही. मात्र, एनआरसी महाराष्ट्रात लागू होऊ दिले जाणार नाही. जर एनआरसी लागू झाले तर हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मातील लोकांना नागरिकता सिद्ध करणे कठीण होऊन बसेल. त्यामुळे मी असं होऊ देणार नाही.”

उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीतून हिंदुत्वाचा नारा पुन्हा एकदा बुलंद केला. त्यांनी म्हटले, “आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही आणि कधीही सोडणार नाही. महाराष्ट्रात आम्ही आघाडीचे सरकार स्थापन केले आहे. याचा अर्थ असा होत नाही की, आम्ही धर्म बदलला आहे. हिंदुत्वाच्या विचारधारेशी आम्ही कुठलीही तडजोड केलेली नाही.” ही मुलाखत येत्या काही दिवसांमध्ये प्रकाशित होणार आहे.

‘हिंदूहृदयसम्राट’वरुन रंगलं राजकारण 

दरम्यान, राज्याच्या राजकारणात सध्या ‘हिंदूहृदयसम्राट’वरुन राजकारण रंगलं आहे. या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि शिवसेना यांच्यामध्ये कलगीतुरा सुरु झाला आहे. हे दोन्ही पक्ष हिंदुत्वाच्या राजकारणावर आपला हक्क सांगत आहेत. नुकतेच ठाण्यामध्ये एक पोस्टर लागले होते, त्यावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांना ‘हिंदूहृदयसम्राट’ अशी उपाधी देण्यात आली होती. पण ‘हिंदुहृदयसम्राट’ म्हणून शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे ओळखले जातात, त्यामुळे आपल्याला ‘हिंदुहृदयसम्राट’ म्हणून नये असा सल्ला राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे.

सीएएविरोधात ठाराव होऊ शकत नाही – अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात सीएएविरोधात ठराव मांडला जाणार का? याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. त्यांनी म्हटल होतं की, “ज्या राज्यांमध्ये सीएएविरोधात ठराव मांडण्यात आला आणि तो मंजूर करण्यात आला. ती राज्ये बिगर भाजपाशासित राज्ये आहेत. तसेच या राज्यांमध्ये एकाच पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे त्यांनी एकमताने असा ठराव मंजूर केला आहे. मात्र, राज्यात आशी परिस्थिती नाही. राज्यात तीन पक्षांचे मिळून आघाडी सरकार सत्तेत असल्याने सीएए विरोधातील ठराव मांडता येणे शक्य नाही.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2020 2:00 pm

Web Title: support to caa but not to nrc will not be implemented in the state says cm aau 85
Next Stories
1 … नाही कुणी भेटलं, तर तहसीलदार मॅडम हिरोईनच आहेत; लोणीकरांची जीभ घसरली
2 कॅबिनेटमध्ये शिवसेनेचे मंत्री फाईल आणि पेन उचण्याचं काम करतात -नितेश राणे
3 स्ट्रॉबेरीवरील संशोधन केंद्र महाबळेश्वरमध्ये उभारणार
Just Now!
X