भाजप प्रदेशाध्यक्ष खा. दानवे यांचा महापौरांना सल्ला

महानगरपालिका भाजपच्या ताब्यात आल्याने, निवडणूक काळात मी जाहीर सभेतून केलेली ३०० कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केवळ निवडणुकीपुरती नसून त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी मनातून शंका काढून टाकावी, नगरला जाहीर केलेला निधी देणारच ही आमची ग्वाही आहे, कबूल केलेल्या निधीसाठी मी तुमच्याबरोबर मुख्यमंत्र्यांकडे येईन. मात्र  मनपामध्ये अल्पमतातील सत्ता आहे, अल्पमतातील सत्ता चालवताना कशा कसरती कराव्या लागतात याची चांगलीच जाणीव आहे, त्यामुळे पक्षातील व पाठिंबा देणारे नगरसेवक व नेते यांना संयमाने सांभाळा, असे आवाहन भाजपचे प्रदेशध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी केले.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष खा. दानवे काल शुक्रवारी सायंकाळी नगरला आले होते. रात्री उशिरा त्यांनी मनपा कार्यालयास भेट दिली. तुतारीच्या निनादात मराठमोळ्या पद्धतीने, फटाक्यांच्या आतषबाजीत दानवे यांचे स्वागत करण्यात आले. पालकमंत्री राम शिंदे, शहर जिल्हाध्यक्ष खा. दिलीप गांधी, आ. शिवाजी कर्डिले आदी उपस्थित होते. महापौर बाबासाहेब वाकळे व उपमहापौर मालन ढोणे यांनी स्वागत केले.

नगरची निवडणूक राज्यात गाजली. स्वबळावर लढलो, वातावरण चांगले होते, मात्र अपेक्षित तेवढे यश मिळाले नाही. अजून थोडया जागा भाजपला मिळायल्या पाहिजे होत्या. मात्र आहे त्या परिस्थितीत इतरांची मदत घेऊन भाजपाने सत्ता मिळवली आहे. अल्पमतात असलो तरी बहाद्दुरी करून दाखवा. शांततेने संयमाने पक्षातील व पाठिंबा देणारे बाहेरील नगरसेवक, नेते मंडळींना सांभाळा. सर्वाच्या सल्ल्याने कामे करून हा कारभार चोख करावा. आता लगेचच लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे मनपाच्या चांगल्या कामांचा परिणाम लोकसभेच्या निवडणुकीवर होणार आहे. आम्ही निधी कबूल केला आहे. यासाठी मी स्वत: तुमच्याबरोबर मुख्यमंत्र्यांकडे येणार आहे.

महापौर वाकळे म्हणाले,की निवडणूक निकालानंतर भाजपचा महापौर होईल हे कोणालाही खरं वाटत नव्हतं. जे शक्य नव्हतं ते सर्वानी करून दाखवले. शहराच्या विकासासाठी विशेष निधीची फार गरज आहे. या आधीच्या शिवसेनेच्या महापौरांनी फक्त घोषणांच्या वल्गना करत पोकळ आश्वासने दिली. त्यामुळे कामे झाली नाहीत. प्रास्ताविक सुरेंद्र गांधी यांनी केले. सूत्रसंचालन नगरसेवक स्वप्नील शिंदे यांनी केले, तर आभार उपमहापौर मालन ढोणे यांनी मानले.