राज्य सरकारने चंद्रपूर जिल्ह्यात घातलेल्या दारूबंदीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. त्याचबरोबर उच्च न्यायालयाने या प्रकरणी एक महिन्याच्या आत निकाल द्यावा, असेही निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले.
राज्य सरकारने १ एप्रिलपासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू केली आहे. दारूबंदीच्या विरोधात दारूनिर्मिती संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर शुक्रवारी सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्त्यांना कोणताही दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला आणि उच्च न्यायालयाने एक महिन्यात या प्रकरणी निकाल द्यावा, असे निर्देश दिले.
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी व्हावी, यासाठी महिलांनी श्रमिक एल्गारच्या वतीने मोठय़ा संख्येने जनआंदोलन केले होते. त्यानंतर सरकारने या जिल्ह्यात दारूबंदी करण्याचा निर्णय घेतला होता.