जळगावमधील घरकुल घोटाळ्याप्रकरणी तब्बल साडे चार वर्षांपासून तुरुंगात असलेल्या सुरेश जैन यांना अखेर दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी सुप्रीम कोर्टाने सुरेश जैन यांना जामीन मंजूर केला आहे.  या प्रकरणातील सर्व साक्षीदारांची तपासणी झाल्याने जामीन द्यावा असे जैन यांच्यावतीने सुप्रीम कोर्टात सांगण्यात आले होते. यानंतर कोर्टाने जैन यांना जामीन मंजूर केला आहे.

जळगावमधील २९ कोटी रुपयांच्या  घरकुल घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे आमदार सुरेश जैन यांना मार्च २०१२ मध्ये अटक करण्यात आली होती.  तुरुंगातून सुटका व्हावी यासाठी जैन यांनी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावले होते. मात्र त्यांचा जामीन अर्ज १२ वेळा फेटाळण्यात आला होता. जैन यांनी काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाकडे अर्ज केला. गेली साडे चार वर्ष तुरुंगात काढल्याने तसेच या प्रकरणातील सर्व साक्षीदारांची तपासणीही झाल्याने आता जामीन मिळावा असा युक्तिवाद जैन यांच्यावतीने कोर्टासमोर करण्यात आला. यानंतर सुप्रीम कोर्टाने जैन यांना जामीन मंजूर केला.

जळगावचे तत्कालीन आयुक्त प्रवीण गेडाम यांनी घरकुल घोटाळ्याप्रकरणी ९० आजी माजी नगरसेवक आणि बिल्डरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी गेडाम यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता. याप्रकरणात त्यांनी सुमारे नऊशे पानांची साक्ष दिली आहे. सुरेश जैन हे एकनाथ खडसे यांचे कट्टरविरोधक म्हणून ओळखले जातात. विशेष म्हणजे खडसेंच्या वाढदिवशीच जैन यांना जामीन मंजूर झाला आहे. आता जैन तुरुंगातून बाहेर येणार असल्याने खडसे यांची डोकेदुखी वाढणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. २००६ मध्ये झालेल्या घरकुल घोटाळ्यात कामाचे कंत्राट मिळालेल्या बांधकाम कंपनीचा पत्ता हा जैन यांच्या घराचा पत्ता निघाला होता. ही कंपनी जैन यांचीच असल्याची चर्चादेखील त्यावेळी रंगली होती.