मुंबई उच्च न्यायालयानं मराठा आरक्षण वैध ठरवलं होतं. त्यानंतर न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयाच याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे.

सरन्यायाधीस शरद बोबडे, न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होईल.
मराठा आरक्षणासाठी राज्यभरात मराठा समाजाकडून ५८ मूकमोर्चे काढण्याच आले होते. त्यानंतर राज्य सरकारनं नोकरी आणि शिक्षणात मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली होती. परंतु त्यानंतर मुबंई उच्च न्यायालयात या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली होती. परंतु मुंबई उच्च न्यायालयानं मराठा आरक्षण वैध ठेवलं होतं. त्यानंतर या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मराठा आरक्षण देतेवेळी घटनापीठाने घालून दिलेल्या ५० टक्क्यांच्या मर्यादेचे उल्लंघन झाल्याचं याचिकेत म्हटलं होतं.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारची बाजू मांडण्यासाठी माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसंच त्यांच्या मदतीसाठी कायदेतज्ज्ञांची एक टीमही नियुक्त करण्यात आली आहे. आज सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचा निकाल काय असेल याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.