माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे या पुस्तकामध्ये स्पष्टपणे लिहिलंय की सगळ्या स्त्रीपुरूषांना मंदिरामध्ये प्रवेश मिळायला हवा, आणि त्यांना योग्य वाटेल त्या पद्धतीनं उपासना करायचा अधिकार असायला हवा, असे आज मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी ट्विट केले आहे. सुप्रीम कोर्टाच्या शबरीमाला मंदिराचे दरवाजे महिलांना उघडे करण्याच्या निकालानंतर ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं उस्फूर्तपणे स्वागत केलं आहे.

ट्विटरच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाचं अभिनंदन करताना प्रबोधनकार ठाकरे कसे पुरोगामी होते याचा दाखला दिला आहे. महिला व पुरूष यांना समान मानणारी विचारसरणी प्रबोधनकारांनी अनेक दशकांपूर्वीच महाराष्ट्राला दिली होती. या पुरोगामी विचारांची आठवण राज यांनी या निमित्तानं करून दिली आहे.

राज यांनी फेसबुकच्या माध्यमातूनही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करणारी पोस्ट केली आहे. ते म्हणतात, “महिलांना मंदिरप्रवेश बंदी करणे हे घटनाबाह्य आहे; असं सांगत प्रत्येक वयोगटातील महिलेला मंदिरात प्रवेश दिलाच पाहिजे, ह्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनापासून स्वागत करत आहे. ह्या निर्णयासाठी सर्वोच्च न्यायालयाचं मनःपूर्वक अभिनंदन. आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे ह्यांच्या ‘देवळांचा धर्म आणि धर्माची देवळं’ पुस्तकात त्यांनी एक विचार निर्भीडपणे मांडला होता. “हिंदू म्हणवणाऱ्या प्रत्येक स्त्री-पुरुषाला मग ती कोणत्याही जातीची असोत प्रत्येकाला देवळात जाऊन हिंदू देवांची यथाभाव, यथासाहित्य स्वतः पूजा करण्याचा, निदान चरणी मस्तक ठेवण्याचा धर्मसिद्ध अधिकार असलाच पाहिजे.”

सर्वोच्च न्यायालयाच्या #SABARIMALA निर्णयानंतर आजोबांचे विचार काळाच्या किती पुढे होते हे जाणवतं, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

प्रबोधनकार ठाकरे अर्थात केशव सीताराम ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वडिल. पत्रकार, समाज सुधारक, लेखक, संपादक, प्रकाशक अशा सगळ्या भूमिका त्यांनी पार पाडल्या. अंधश्रद्धा आणि समाजातील वाईट चालीरितींवर आपल्या लेखणीतून त्यांनी प्रखरपणे प्रहार केला. बाळासाहेब ठाकरे हेदेखील आपल्या वडिलांना प्रेरणास्थान मानत असत. वडिलांनी सुधारणावादी विचार मांडल्याने शेणमार कशी सहन केली, किती यातना भोगल्या ते आपण डोळ्यांनी पाहिल्याचे बाळासाहेब ठाकरे कायम सांगत. त्यांच्या अनेक सुधारणावादी विचारांच्या आठवणी राज ठाकरेंनीही आपल्या भाषणात सांगितल्या आहेत. आता याच थोर माणसाच्या विचारांवर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केल्याचे सांगत राज ठाकरेंनी त्याची आठवण करून दिली आहे.