सध्याचं सरकार दहशतवादाबद्दल गंभीर नाही ही बाब दुर्दैवी आहे. केवळ भाषणापुरतंच ५६ इंच छाती आहे असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी नरेंद्र मोदींना लगावला आहे. बारामती रेल्वे स्थानकात सुरु असलेल्या कामांची सुप्रिया सुळे यांनी पाहणी केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारवर टीका केली.

सातत्यानं सुरक्षितता आणि रोजगारीबद्दल बोललं जात होतं. पण सध्या दहशतवादाशिवाय दुसरं काहीही ऐकायला मिळत नाही असं सांगताना पुलवामाच्या घटनेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी फोटोसेशन करण्यात व्यस्त होते अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली. नोटाबंदीनंतर दहशतवाद कमी होईल असा दावा करण्यात आला होता. मात्र गेल्या दोन वर्षात कधी नव्हती इतकी अस्वस्थता संपूर्ण देशात पहायला मिळत आहे असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

यावेळी सुप्रिया सुळे यांनी सरकार धनगर समाजाची फसवणूक करत असल्याचा आरोपही केला. राज्य शासनानं धनगर आरक्षणाबाबत कोणताही प्रस्ताव पाठवलेला नसल्यानं हा विषय रेंगाळत पडला असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे. पुढे बोलताना त्यांनी शेतकऱ्यांचं कंबरडं मोडण्याचं काम या सरकारनं केलं असल्याचं म्हटलं. चुकीचं काम करणाऱ्या सरकारला धडा शिकवण्याची वेळ आली आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं.