हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचा हल्लाबोल मोर्चा नागपूरमध्ये येऊन धडकला. यावेळी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्त्वाखाली येथील शरद पवार महाविद्यालय आणि चक्काजाम आंदोलन करण्यात आले. तेव्हा कार्यकर्ते आणि पोलिसांत बाचाबाची झाली. पोलिसांनी सुप्रिया सुळे आणि अनिल देशमुख यांच्यासह काही कार्यकर्त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत सुप्रिया सुळे यांच्या हाताला दुखापत झाली. यानंतर पोलिसांनी सुप्रिया सुळे यांना अटक केली. काहीवेळाने त्यांना सोडूनही देण्यात आले. याबद्दल बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, या प्रकरणाचा इतका गवगवा करण्याची गरज नाही. राष्ट्रवादीच्या कोणत्याही कार्यकर्त्याने पोलिसांना धक्काबुक्की केली नाही. एखाद्या खासदाराला अटक करताना पोलिसांनी काही प्रोटोकॉल पाळणे अपेक्षित असते. मात्र, त्यावेळी पोलिसांकडून धसमुसळेपणा झाला. हे पाहून काही कार्यकर्ते माझ्या मदतीला आले. त्यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. या सगळ्यात मलाही दुखापत झाली. मात्र, आमची याबद्दल तक्रार नाही. आम्ही आमचे काम करत होतो आणि पोलिसांनी त्यांचे काम केले. त्यामुळे या सगळ्याचा गवगवा करण्याची गरज नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

यवतमाळ येथून निघालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल पदयात्रेने आज १५५ किमी. चा प्रवास पूर्ण करत नागपूर शहरात प्रवेश केला. या शेतकरी दिंडीने विमानतळ रोडवर चक्का जाम करत ‘नही चलेगी नही चलेगी, तानाशाही नही चलेगी’च्या घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. हे सरकार निष्क्रीय असून त्यांनी कर्जमाफीच्या निधीवर डल्ला मारला आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याऐवजी त्यांनी जाहिरातींवर हा निधी खर्च केल्याचा आरोप आंदोलकांनी यावेळी केला.