नेत्यांच्या पक्षांतराबाबत सुप्रिया सुळे यांची टोलेबाजी, संवाद यात्रेला सुरुवात

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजप-सेनेत इतक्या नेत्यांचे पक्षांतर झाले आहे की विधानसभेच्या निवडणुकीनंतर कोणाचेही सरकार आले तरी ते सरकार काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचेच असेल. आमच्याकडील  वाईट समजले जाणारे, व आरोप करण्यात आलेले नेते त्यांच्याकडे गेले की ‘क्लिन’ कसे ठरतात?. भाजपकडे अशी कोणती ‘वॉशिंग पावडर’ आहे, याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे, अशी टोलेबाजी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नगरमध्ये  शुक्रवारी केली.

राष्ट्रवादीच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांच्या संवाद यात्रेची सुरुवात नगरमधून झाली. त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील नागरिकांशी संवाद साधत राष्ट्रवादीची भूमिका मांडली, तत्पूर्वी त्या पत्रकारांशी बोलत होत्या. राज्यातील १५ जिल्ह्य़ात त्यांची संवाद यात्रा जाणार आहे. सभा न घेता, विविध घटकांशी त्या संवाद साधणार आहेत. पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, महिला जिल्हाध्यक्ष मंजुषा गुंड, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजश्री घुले, शहर जिल्हाध्यक्ष रेश्मा आठरे आदी यावेळी उपस्थित होते.

पूर्वी नागरिकांना ईडी, सीबीआय हे शब्द माहिती नव्हते, आता त्याचा उपयोग दडपशाहीसाठी केला जात आहे. सत्ता आमचीही होती, परंतु असा दुरुपयोग कधी पूर्वी झालेला नाही. आता विधानसभा निवडणुका आल्या, की ईडी, सीबीआय यांच्या नोटिसा यायला लागतात.  ईडी, सीबीआय, बँका व कारखाने या चार घटकांमुळेच भाजपमध्ये प्रवेश होतो आहे. जे जातात, त्यांना माझ्या शुभेच्छा, परंतु मधुकर पिचड यांच्यासारखे नेते जातात, त्याचे दु:ख होते. पिचड यांना आम्ही आमच्या कुटुंबातील मानले होते. परंतु पवार कुटुंबीयांनी सोडुन जाणाऱ्यांबद्दल कधी कटुता ठेवली नाही, पलटवारही केलेला नाही, ती आमची संस्कृती नाही. परंतु सध्या दडपशाहीच्या राजकारणाची संस्कृती वाढत आहे, अशी टीकाही खा. सुळे यांनी केली. कितीही जण पक्षाला सोडून गेले तरी राष्ट्रवादी पुन्हा जोमाने उभी राहील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

सर्वच आघाडय़ांवर महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला, याकडे लक्ष वेधले असता खा. सुळे यांनी, मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भातील आकडेवारी जाहीर करावी, असे आव्हान दिले. देशात आर्थिक मंदी व बेरोजगारीचे भयानक संकट निर्माण झालेले असतानाही, तसेच अर्थमंत्री स्वत:च नोटबंदीमुळे भ्रष्टाचार थांबलेला नाही, अशी कबुली देत असताना सरकार धोरणात्मक निर्णय घेत नसल्याने सर्वसामान्य भरडला जात आहे, देशातील मंदीचे वातावरण हे केवळ नोटबंदी व जीएसटीमुळेच निर्माण झालेले आहे, असा आरोप त्यांनी केला. राज्यात आतापर्यंत सर्वाधिक एमआयडीसी स्थापन झाल्या त्या सर्व शरद पवार यांच्या काळातील आहेत, याकडेही खा. सुळे यांनी लक्ष वेधले.

भाजपच्या दडपशाहीच्या राजकारणाची नवी ‘स्टाईल’

भाजपकडे जनादेश असतानाही ते विरोधात बोलणाऱ्यांचा आवाज ईडी, सीबीआयमार्फत का दाबत आहेत, दडपशाहीच्या राजकारणाची ही नवीन ‘स्टाईल’ सन २०१४ पासून सुरु झाली आहे. निवडणुका आल्या की ठरवून नोटिसा पाठवल्या जाऊ लागल्या आहेत, असा स्पष्ट आरोप खा. सुळे यांनी केला. राज्य सहकारी बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले गेले आहेत, याकडे लक्ष वेधले असता सुळे म्हणाल्या,की बाब न्यायप्रविष्ट असल्याने मी यावर बोलणार नाही, परंतु आम्ही संघर्षांसाठी तयार आहोत. अनेक नेत्यांबाबत असा आदेश असताना केवळ अजित पवारांचेच नाव ठळकपणे दिले जात आहे. जम्मु-काश्मीरचे कलम ३७० वगळण्यास विरोध नाही, परंतु ते ज्या पद्धतीने चर्चा होऊ न देता वगळले, त्याला आक्षेप आहे. जम्मू-काश्मीरशिवाय देशातील इतर ११ राज्यांतही हे कलम लागू आहे, त्याबद्दल भाजप काही बोलत नाही, याकडे सुळे यांनी लक्ष वेधले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sule on bjp mpg
First published on: 24-08-2019 at 01:29 IST