भाजपबरोबर जाणार नसल्याची घोषणा करून निर्णय प्रक्रियेत महत्त्वाचे स्थान असल्याचे संकेत

राष्ट्रवादी भाजपबरोबर जाणार, केंद्रीय मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचा समावेश होणार, पक्षाचे दोन नेते मंत्री होणार, अशी चर्चा गेले आठवडाभर सुरू असताना राष्ट्रवादीकडून काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली जात नसल्याने संशय अधिक बळावला होता. पण सुप्रिया सुळे यांनी भाजपबरोबर जाणार नसल्याचे स्पष्ट करून कार्यकर्त्यांमध्ये योग्य तो संदेश दिला. यावरून सुप्रिया पक्षात अधिक प्रभावशाली झाल्याचे मानले जात आहे.

भाजपबरोबर जाणार असल्याची शक्यता करणारे व्टिट प्रफुल्ल पटेल यांनी केले असले तरी पक्षाची योग्य भूमिका आधी सुप्रिया सुळे यांनी पंढरपूरमध्ये मांडली. तसेच काँग्रेसबरोबर आघाडीसाठी पक्ष अनुकूल असल्याचे स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होणार, असे माध्यमांमधून प्रसिद्ध होऊ लागले. राष्ट्रवादीकडून कोणीच काहीच प्रतिक्रिया व्यक्त करीत नसल्याने संशयाला वाव निर्माण झाला. अलीकडेच गुजरातमधील राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या भूमिकेमुळे दिल्लीत संभ्रम निर्माण झाला होता. गुजरात राज्यसभा निवडणुकीनंतर झालेल्या विरोधी पक्ष नेत्यांच्या बैठकीवर राष्ट्रवादीने बहिष्कार घातल्याने राष्ट्रवादीचे भाजपशी सूत जमले, असा निष्कर्ष काढला जाऊ लागला.

राष्ट्रवादीबद्दल निर्माण झालेल्या संभ्रमामुळे कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू झाली होती.  नेते व आमदार पक्षाच्या भूमिकेविषयी अंधारात होते. पण सुप्रिया सुळे यांनी पुढाकार घेत राष्ट्रवादीबद्दल सुरू असलेल्या चर्चेला विराम दिला. पक्ष भाजपबरोबर जाणार नाहीच तसेच काँग्रेसबद्दल पक्षाची भूमिका अनुकूल असल्याचे संकेत दिले. सुप्रिया सुळे यांनी हे स्पष्टीकरण केल्याने पक्षाचे नेते वेगळा अर्थ काढीत आहेत.

आतापर्यंत सुप्रिया सुळे या पक्षाच्या धोरणात्मक निर्णय किंवा अन्य कोणत्याही भूमिकेबद्दल मतप्रदर्शन करीत नसत. पक्षावर झालेल्या आरोपांवर पक्षाध्यक्ष शरद पवार किंवा प्रवक्त्यांकडून त्याला उत्तर दिले जात असे. पक्षावर अनेक आरोप झाले, पण सुप्रिया सुळे यांनी कधीही आतापर्यंत भूमिका मांडली नव्हती. प्रथमच सुप्रिया सुळे यांनी पक्षाच्या धोरणावर भाष्य केले किंवा पक्षाची भूमिका स्पष्ट केली. सुप्रिया सुळे यांनी पक्षाची बाजू सावरली नसती तर भाजपबरोबरच्या संबंधांबाबत वेगळा संदेश गेला असता, असे पक्षातील नेत्यांचे मत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आक्रमक होण्यास पक्षाचे नेते टाळतात. जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकाटिप्पणी केली असली तरी अन्य नेते जरा सबुरीनेच घेतात, असा अनुभव आहे. पण मध्यंतरी सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढविला होता. ‘नळावरच्या बायकांप्रमाणे मुख्यमंत्री वसावसा भांडतात’ अशी शेरेबाजी सुप्रियाताईंनी केली होती. सुप्रिया सुळे या फारशा कोणावर वैयक्तिक स्वरूपाची टीका करीत नाहीत. पण मुख्यमंत्र्यांवर त्यांनी जोरदार हल्ला चढविला होता.

अजितदादा पवार आक्रमक नेते म्हणून प्रसिद्ध असले तरी सिंचन घोटाळ्याच्या चौकशीची टांगती तलवार असल्याने ते टोकाची भूमिका घेत नाहीत, अशी चर्चा असते. नुकत्याच संपलेल्या पावसाळी अधिवेशनात अजितदादा प्रथमच जास्त आक्रमक दिसले. सुप्रियाताई या आता पक्षाची भूमिका मांडू लागल्याने त्यांच्याकडे सूत्रे आल्याचे मानले जाते.

पक्षावर अनेक आरोप झाले, पण सुप्रिया सुळे यांनी कधीही आतापर्यंत भूमिका मांडली नव्हती. प्रथमच सुप्रिया सुळे यांनी पक्षाच्या धोरणावर भाष्य केले किंवा पक्षाची भूमिका स्पष्ट केली. सुप्रिया सुळे यांनी पक्षाची बाजू सावरली नसती तर भाजपबरोबरच्या संबंधांबाबत वेगळा संदेश गेला असता, असे पक्षातील नेत्यांचे मत आहे.