पाकिस्तान सीमेवर काश्मीरमधील कथुआ जिल्हय़ात पोलीस चौकीवर शुक्रवारी झालेल्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या सूरज मोहिते या जवानावर वाईत रविवारी लष्करी व शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. वाईमध्ये दिवसभर अघोषित बंद पाळण्यात आला.
शुक्रवारी पहाटे पाचच्या दरम्यान केंद्रीय राखीव पोलीस दलात (सीआरपीएफ)सूरज मोहिते आपल्या सहकाऱ्यांसह काश्मिरातील जम्मू पठाणकोट राष्ट्रीय महामार्गावरील कथुआ जिल्हय़ातील राजबाग पोलीस ठाण्यात विश्रांतीसाठी पोहोचला होता.
त्याचवेळी झालेल्या धुमश्चक्रीत सूरजसह तीन जवान मारले गेले. पण सूरजमुळे १४ जवानांचे प्राण वाचले, अशी माहिती कथुआ येथे सीआरपीएफमधील हवालदार पाटील यांनी दिली.
सूरजचे पाíथव सकाळी साडेदहा  वाजता त्याच्या मूळ गाव गणेशनगर सरताळे (ता जावली) येथे पोहोचले. वाईतील अंबिकानगरमधील घरासमोर सूरजच्या अंत्यदर्शनाची सोय करण्यात आली होती. सिध्दनाथवाडीतील स्मशानभूमीत लष्करी सलामी व पोलीस मानवंदना देण्यात आली.