बैलाचे प्राण वाचले, गंठणही मिळाले

सुनील नवले, संगमनेर

पोळ्याच्या सणाच्या दिवशी हौसेने गावात मिरवून आणलेली खिलारी बैलजोडी धन्याने दाराशी आणली. ते पाहून घरधनीणीची मोठी लगबग उडाली. ताटामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य, पेटता दिवा, रुपयाचे नाणे घेऊन डोईवरील पदर सावरत धनीण बैलांना ओवाळण्यासाठी पुढे सरसावली. मात्र  ओवाळण्यासाठी सोन्याचा दागिना ताटात नाही, हे लक्षात येताच तिने गळ्यातील दीड लाख रुपये किमतीचे, चार तोळ्याचे सोन्याचे गंठण ताटात टाकले. मनाप्रमाणे बैलांना ओवाळून झाले आणि पुरणपोळी देण्यासाठी ताट पुढे करताच त्या मुक्या जनावराने पोळीसह ते सोन्याचे गंठणही गिळून घेतले. मात्र त्यांच्यासाठी देवदूतासारख्या धावून आलेल्या डॉक्टरने बैलावर शस्त्रक्रिया करत सोनेही बाहेर काढले आणि बैलाचे प्राणही वाचवले.

तालुक्यातील रायते वाघापूर येथील प्रगतशील शेतकरी बापूसाहेब प्रभाकर शिंदे यांच्या घरी पोळ्याच्या दिवशी म्हणजे ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ही घटना घडली.बैलाना सणाला पुरणपोळीचा नैवेद्य ठेवला, पण ओवाळताना लक्षात आले की त्यात सोन्याचा दागिना नाही. म्हणून त्या माउलीने मागचा—पुढचा विचार न करता गळ्यातील सोन्याचे चार तोळ्याचे गंठण ताटात टाकले आणि ओवाळणी पूर्ण केली. सर्व मनासारखे घडले म्हणून आनंदात असताना पुरणपोळी खाऊ  घालावी यासाठी बैलाच्या तोंडापुढे ताट करताच बैलाने आपल्या मोठय़ा घासात पुरणपोळीसह ते गंठणही खाऊन टाकले. अखेर राजहंस दूध संघाचे केंद्र अधिकारी डॉ. नारायण नेहे यांना या प्रकाराची माहिती देण्यात आली. पशुवैद्यक शास्त्राचा दांडगा अनुभव असणारे डॉ.नेहे लगोलग  शिंदे दाम्पत्याच्या घरी दाखल झाले.  काय करावे हे सुरुवातीला त्यांनाही सुचेनासे झाले. अखेर धातुशोधक यंत्र आणि सोनोग्राफीच्या सहाय्याने बैलाची तपासणी करण्यात आली. त्यावेळी सोन्याचे गंठण बैलाच्या पोटातील आतडय़ातच असल्याचे डॉ.  नेहे यांच्या लक्षात आले. बैलाची शस्त्रक्रिया करण्याशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी शिंदे यांना सांगितले.अखेर दहा दिवसांनंतर म्हणजे काल सोमवारी डॉ. नेहे यांनी बैलाची शस्त्रक्रिया केली. डॉ. सोमनाथ चत्तर यांनी त्यांना शस्त्रक्रिया मदत केली. सोन्याचे गंठण डॉक्टरांनी अलगद बाहेर काढले.  चांगले खाऊपिऊ  घातले की पहिल्यासारखा बैल ठणठणीत बरा होईल असा दिलासा डॉ. नेहे यांनी दिल्याने शिंदे कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार उरला नाही.