Surgical Strike 2: भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक केल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हवाई दलाचे अभिनंदन केले आहे. भारतीय हवाई दलाने ज्या पद्धतीने अतिरेक्यांचे तळ उध्वस्त केले, त्या बद्दल मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे भारतीय हवाई दलाचं मनापासून अभिनंदन करतो, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

पुलवामा येथे १४ फेब्रुवारी रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. या हल्ल्याला मंगळवारी १२ दिवस पूर्ण होत असतानाच भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून बालाकोट येथे एअर स्ट्राइक केले. यात ३५० दहशतवादी मारले गेले. भारताच्या सर्जिकल स्ट्राइकनंतर देशभरातील राजकीय पक्षांनी भारतीय हवाई दलाचे कौतुक केले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील ट्विटरवरुन यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय हवाई दलाने ज्या पद्धतीने अतिरेक्यांचे तळ उध्वस्त केले, त्या बद्दल मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे भारतीय हवाई दलाचं मनापासून अभिनंदन करतो, असे ट्विट त्यांनी केले आहे.

दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील सुरक्षा दलांचे अभिनंदन केले. भारतीय वायूसेनेच्या या अभिमानास्पद कामगिरीस काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सलाम केला आहे. तर शिवसेनेनेही या कारवाईचे स्वागत केले आहे.