परिसरात ३६० जवानांचा कडक बंदोबस्त

नक्षलवाद्यांनी ८३ वाहने जाळल्यावर आणि ७० ग्रामसभा, स्थानिक रहिवासी, विविध राजकीय पक्ष संघटनांचा विरोध असतांनाही रविवारपासून लॉयड मेटल्स कंपनीने राज्य राखीव पोलिस दलाच्या ३६० जवानांच्या कडक सुरक्षेत सूरजागड पहाडावर लोह उत्खनन सुरू केल्याने ऐन जिल्हा परिषद निवडणुकीत नक्षलवाद्यांकडून हिंसक कारवायांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, रविवारी११ ट्रक लोह खनिजाची वाहतूक करण्यात आली.

एटापल्ली तालुक्यातील सूरजागड येथे लॉयड मेटल्स कंपनीने वन व महसूल विभागाचे सर्व नियम धाब्यावर बसवून लोह उत्खनन सुरू केले होते. परिणामत: नक्षलवाद्यांनी २३ डिसेंबरला ८३ वाहने जाळून उत्खननास विरोध असल्याचे दाखवून दिले. या घटनेच्या ४२ दिवसांनी रविवारपासून लॉयड मेटल्स कंपनीने कडक सुरक्षेत उत्खननास पुन्हा सुरू केले आहे. दहा वर्षांंपूर्वी म्हणजे, २००७ मध्ये या पहाडीच्या ३४८.०९ हेक्टरची लिज २० वर्षांंकरिता लॉयड मेटल्स कंपनीला शासनाने दिली आहे. अगदी सुरुवातीपासूनच स्थानिक आदिवासी, विविध राजकीय पक्ष व अन्य संघटनांनी या प्रकल्पाला विरोध केल्यामुळे कंपनी ९ वष्रे उत्खनन करू शकली नव्हती. दरम्यानच्या काळात २०११ मध्ये कंपनीच्या दोन बडय़ा अधिकाऱ्यांची व पोलिस पाटलाची नक्षलवाद्यांनी हत्या केली होती. त्यानंतर २०१६ मध्ये खनिजाचे उत्खनन व वाहतूक सुरू करून तेथील लोह खनिज घुग्घुस येथील कंपनीत आणण्यात येत होते, पण त्या विरोधात आदिवासींनी तीव्र आंदोलन छेडूनही पोलिस व महसूल प्रशासनाच्या मदतीने सुरूच होते. त्यामुळे नक्षलवाद्यांनी उत्खनन बंद करण्याचा इशारा पत्रकातून देऊन २३ डिसेंबरला भरदिवसा ८३ वाहने जाळून ७०- ८० कामगारांना बेदम मारहाण केली. त्यानंतर ४२ दिवस हे काम बंद होते. आता रविवारपासून लॉयड मेटल्सने पुन्हा लोह खनिज उत्खनन व वाहतूक सुरू केली आहे.

विशेष म्हणजे, अलीकडेच ठाकूरदेव यात्रा महोत्सवात या परिसरातील ७० ग्रामसभांनी या विरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे ऐन जिल्हा परिषद निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर या परिसरात पुन्हा हिंसाचार भडकण्याची चिन्हे दिसत आहेत. यासंदर्भात अधिक माहितीसाठी एटापल्लीचे पोलिस निरीक्षक शिवाजी राऊत यांच्आशी संपर्क साधल्यावर रविवारपासून लोह उत्खनन व वाहतूक सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली.

रविवारी ११ ट्रक वाहतूक झाली. राज्य राखीव पोलिस दलाच्या ५ कंपन्या तेथे असून त्यातील ३६० जवान सूरजागडवर, तर उर्वरीत जवान रस्त्यांवर तैनात करण्यात आले असल्याची माहिती राऊत यांनी दिली. मात्र, इतर माहिती देण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला. उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन जाधव यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी बैठकीत व्यस्त असल्याचे सांगून बोलण्यास नकार दिला.

पालकमंत्री अंबरीश आत्राम नक्षलवाद्यांचे लक्ष्य

हे उत्खनन सुरू होताच नक्षलवाद्यांनी पत्रकबाजी सुरू केली असून यातून निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करून उत्खननाच्या मुद्यावरून पालकमंत्री अंबरीश आत्राम यांच्यावर तीव्र टीका केली आहे. नक्षलवाद्यांनी बरेच बॅनर्स एटापल्लीसह राजाराम खांदला आणि रायगट्टा भागात लावली आहेत.