दलित डॉक्टरच्या हत्येच्या योजनेला जहाल नर्मदाचा विरोध

बहुचर्चित सूरजागड लोहखाण प्रकल्पासंबंधी दंडकारण्यात नक्षलवाद्यांनी जनसुनावणी घेतल्याची धक्कादायक बाब नक्षलवाद्यांच्या नुकत्याच निघालेल्या एका पत्रकावरून पुढे आली. या पत्रकानुसार नक्षलवाद्यांविरोधात गरळ ओकणाऱ्या एका दलित डॉक्टरची हत्या करण्याची योजना नक्षलवाद्यांनी आखली होती. मात्र, दलित समाज चळवळीपासून दूर जाईल, हे जहाल नक्षलवादी नेता नर्मदा हिच्या लक्षात आल्याने हा निर्णय बदलण्यात आल्याचेही यात म्हटले आहे.

सूरजागड प्रकरणी नक्षलवाद्यांची लॉयड मेटल्स या कंपनीसोबत मांडवली झाल्याची चर्चा चांगलीच रंगली होती. सूरजागड प्रकरणात नक्षल चळवळीची प्रतिमा मलिन होत असल्याचे वरिष्ठ कॅडरची जहाल नक्षलवादी नेता नर्मदा हिच्या लक्षात येताच तिने आता भूमिका बदलली असल्याचे पुढे येत आहे. त्यातूनच नक्षलवाद्यांनी आता हळुहळू का होईना या प्रकल्पाला विरोध सुरू केला आहे. हा विरोध स्पष्टपणे समोर येण्यापूर्वीच नक्षलवाद्यांनी बहुचर्चित सूरजागड लोहखाण प्रकल्पासंबंधी दंडकारण्यात जनसुनावणी घेतली होती, अशी धक्कदायक माहिती समोर आली आहे. भूमकाल संघटनेने नक्षलवाद्यांच्या एका पत्रकावरून ही बाब समोर आल्याचे म्हटले आहे.

नक्षलवाद्यांच्या नुकत्याच निघालेल्या या पत्रकानुसार सूरजागड खाण प्रकल्पासंबंधी जनसुनावणी घेतल्याचे जाहीर करण्यात आले. या पत्रकानुसार एटापल्ली तालुक्यातील एका डॉक्टरवर अनेक गंभीर आरोप नक्षलवादी नेत्यांनी केले असून ते सर्व गुन्हे त्याने कबूल केले आहेत, असेही या पत्रकात म्हटले आहे. यासंदर्भात भूमकाल संघटनेने केलेल्या सत्यशोधनानुसार त्या बैठकीत डॉक्टरला मारण्याचा निर्णय नक्षलवादी नेत्यांनी लोकांच्या व जनतेच्या सांगण्यावरून घेतला होता. मात्र, नर्मदाने असा युक्तीवाद केला की, हा व्यक्ती दलित समाजाचा असल्याने त्याचा खून केल्यास हा समाज आपल्या विरोधात जाईल. ती समोर असेही म्हणाली की, दामरंचा येथील पत्रु दुर्गे या दलित उपसरपंचाचा खून केल्याने हा समाजात नक्षलवाद्यांबद्दल मोठय़ा प्रमाणात नाराजी निर्माण झालेली आहे. तसेच नुकत्याच झालेल्या आंबेडकर जयंतीच्या घटनेनंतर तर दलित समाज नक्षलवाद्यांच्या विरोधात गेला आहे. हा सर्व विचार करता नक्षलवादी नेते लोकांनी व विशेषत: नर्मदा अक्काने या डॉक्टरचा खून करू नये, असा निर्णय घेतला. हा ऐतिहासिक निर्णय होता. आम्ही नम्रपणे सांगतो की, पत्रू दुर्गे हत्याकांडानंतर नक्षलवाद्यांचे दलित अत्याचार हे प्रकरण भूमकाल संघटनेने मोठय़ा प्रमाणात उचलून धरले असून मुंबईपर्यंत, तसेच मानवाधिकार आयोगापर्यंत नेले. देशात प्रथमच नक्षलवादी विरोधात मानवाधिकार हननाचा गुन्हा दाखल करण्यात यश आले. त्याचा परिणाम म्हणून डॉक्टरचा जीव वाचला, असाही दावा भूमकाल संघटनेने केला आहे. दरम्यान, यानंतर दलित असो की आदिवासी जनसुनवाई होईलच, असेही नक्षलवाद्यांच्या या पत्रकात म्हटले आहे.

नक्षलवाद्यांचा आज बंद

नक्षलवाद्यांनी उद्या, मंगळवारी संपूर्ण गडचिरोली जिल्हा बंदचे आवाहन केले आहे. जिल्ह्य़ात अतिदुर्गम भामरागड, एटापल्ली, सिरोंचा, अहेरी, धानोरा, मुलचेरा या नक्षलग्रस्त तालुक्यांमध्ये ठिकठिकाणी पोस्टर्स व बॅनर्स लावून बंदचे आवाहन करतांनाच उत्तर गडचिरोली डिव्हिजन समिती सदस्या कॉ. रजिता उसेंडी, कॉ. मिनको नरोटी, कॉ. आरती पूडो, कॉ. निर्मला ढुम्मा, कॉ. सरिता कोवासी अमर रहे, असे बॅनर्स लावून गडचिरोलीत तीव्र हिंसाचार घडवून आणण्याचे व स्थानिक आदिवासींना बंद यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.