News Flash

तीन हजार टन आंब्यांची पडझड

जिल्ह्यात आंब्याचे सरासरी दोन ते अडीच हजार टन प्रति हेक्टर इतके उत्पादन मिळत असते.

कृषी विभागाकडून पाऊस थांबल्यानंतर  सर्वेक्षण

पालघर : पालघर जिल्ह्यातील डहाणू, पालघर, तलासरी व वसई या चार तालुक्यांतील सुमारे अठराशे ते दोन हजार हेक्टर क्षेत्रावर असलेल्या आंबा उत्पादनावर चक्रीवादळाचा परिणाम झाला असून सद्य:स्थितीत झाडावर असलेल्या तीन हजार टनापेक्षा अधिक आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

पालघर तालुक्यात सुमारे एक हजार हेक्टर, डहाणू तालुक्यात ५०० हेक्टर तर वसई व तलासरी तालुक्यात पाचशे असे सुमारे दोन हजार हेक्टरवर आंबा लागवड आहे. रविवारी सायंकाळपासून किनारपट्टीच्या तालुक्यांमध्ये जोरदार वारे वाहू लागल्याने अनेक ठिकाणी झाडावर असलेला आंबा वादळी वाऱ्यामुळे खाली गळून गेल्याचे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

जिल्ह्यात आंब्याचे सरासरी दोन ते अडीच हजार टन प्रति हेक्टर इतके उत्पादन मिळत असते. डिसेंबर- जानेवारीमध्ये आंब्याला येणारा मोहर यंदा काहीसा उशिरा आल्याने आंबा तयार होण्यास विलंब झाला आहे. सध्या ७० ते ८० टक्के फळ झाडावर होते व वादळी वातावरणात आंबा खाली गळून पडल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पाऊस थांबल्यानंतर आंबा नुकसानीचे सर्वेक्षण सुरू केले जाईल असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. अनेक शेतकऱ्यांनी हवामानावर आधारित आंबा फळपीक योजनेमध्ये सहभागी झाले असून हवामानाशी संबंधित मापदंडांचा अभ्यास करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत निर्णय येत्या काही दिवसांत घेण्यात येईल असेही कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2021 12:48 am

Web Title: survey after the rain stopped by the department of agriculture akp 94
Next Stories
1 पालघर जिल्ह्याला तडाखा
2 विक्रमगड, वाड्यात बागायदार चिंतेत
3 वादळीवाऱ्याचा फटक्यामुळे बोटींचे नुकसान
Just Now!
X