सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणामध्ये रोज नवीन माहिती समोर येत असतानाच या प्रकरणावरुन राजकारणही चांगलेच तापले आहे. अशातच आता या प्रकरणामध्ये अंमली पदार्थांसंदर्भातील खुलाश्यानंतर अंमलीपदार्थ विरोधी पथकाकडूनही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सुशांतची कथित प्रेयसी रिया चक्रवर्ती, मित्र संदीप सिंह यांनी सुशांतला अंमली पदार्थ दिल्याचा आरोप काही व्हॉ्सअपवरील संवादांचा आधार घेत केला जात आहे.  अंमली पदार्थ्यांच्या विषयावरुन आता भाजपाचे आमदार राम कदम यांनी बॉलिवूडमधील अंमली पदार्थांच्या रॅकेटची चौकशी करावी अशी मागणी केली आहे. कदम यांनी मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात पत्र पाठलं आहे. त्याचा फोटो त्यांनी ट्विट केला आहे. याच फोटोवर रिप्लाय करताना काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा संदीप सिंहबरोबरचा फोटो पोस्ट करत या प्रकरणामध्ये राज्य सरकारने भाजपा अँगलनेही तपास करावा अशी मागणी केली आहे.

राम कदम काय म्हणाले?

“बॉलिवुडमधील अंमली पदार्थ्यांच्या सेवनासंदर्भातील चर्चा तुमच्यापर्यंत पोहचलीच असेल. याच पार्श्वभूमीवर मी तुम्हाला विनंती करतो की बॉलीवुडमधील कलाकारांकडून अंमली पदार्थांचे सेवन केले जात असल्याच्या आरोपांची सखोल चौकशी करुन हे रॅकेट उद्धवस्त करावे. बॉलिवूडमधील कलाकारांकडे आदर्श म्हणून पाहिले जाते. टीव्ही, चित्रपट आणि सोशल मिडियावरील तरुणांवर याचा दिर्घकालीन परिणाम होईल असं वाटत असल्याचे या प्रकरणाबद्दल आगामी अधिवेशनामध्ये सभागृहात चर्चा घडवून आणावी तसेच सखोल चौकशीचे आदेश द्यावेत,” असं राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.

सावंत यांनी केली मागणी

हेच ट्विट रिट्विट करत सचिन सावंत यांनी थेट भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. “उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुख यांना मी विनंती करतो की भाजपा अँगलकडेही पहावे. सीबीआयकडून संदीप सिंहची सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात अंमली पदार्थांसंदर्भात चौकशी केली जाणार आहे. संदीप हा (पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आयुष्यावत आधारित) बायोपीक ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाचा निर्माता होता. ज्या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण फडणवीस यांच्या हस्ते झाले,” असं ट्विट सावंत यांनी केलं आहे. या ट्विटबरोबर त्यांनी या चित्रपटाच्या पोस्टर लॉन्च सोहळ्याचे फोटोही पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये संदीप सिंह, फडणवीस, चित्रपटात मोदींची भूमिका साकारणारा अभिनेता विवेक ओबोरॉय एकाच मंचावर उभे असल्याचे दिसत आहे.

फडणवीसांचे उत्तर

देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यामध्ये कोवीड सेंटरचे उद्घाटन केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना सावंत यांनी केलेल्या आरोपावर उत्तर दिलं. “सचिन सावंत यांचं राज्य आहे ना, मग त्यांच्या मुंबई पोलिसांनी सगळ्यांना दूर का ठेवलं. कोणाची चौकशी का केली नाही. पहिल्या दिवसापासून आत्महत्या का सांगितलं? फक्त माझ्या फोटोचा विषय नाही. ते डायरेक्टर असल्याने मी त्या कार्यक्रमात असेन. पण तीच व्यक्ती बाळासाहेबांवर बनणाऱ्या चित्रपटाचे डायरेक्टर किंवा प्रोड्यूसर होती. याची देखील न्यूज आहे. सचिन सावंत अलीकडच्या काळात अभ्यास करत नाहीत. त्यांना विधान परिषेदवर पाठवत नाही म्हणून निराश होऊन बोलतात,” अशा शब्दामध्ये फडणवीस यांनी सावंत यांनी केलेल्या टीकेवर उत्तर दिलं.