अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून राज्यात बरंच मोठं वादंग निर्माण झालं होतं. सुशांतच्या आत्महत्येनंतर बिहार पोलीस व सरकारनं घेतलेली उडी, त्यानंतर सीबीआयकडे गेलेला तपास, कंगना रणौतनं मुंबई पोलिसांवर केलेले आरोप… अशा अनेक घडामोडी या प्रकरणात घडल्या. मात्र, एम्सच्या डॉक्टरांनी दिलेल्या शवविच्छेदन अहवालानंतर या वादावर पडदा पडला आहे. अहवाल समोर आल्यानंतर कंगना रणौतसह मुंबई पोलिसांवर टीका करणाऱ्यांवर शिवसेनेनं नामोल्लेख टाळत निशाणा साधला आहे.

शिवसेनेच्या उपनेत्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी एम्सच्या अहवालातील निष्कर्ष समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यांना टोला लगावला आहे. “ज्यांनी मुंबई पोलिसांवर टीका केली, त्यांना शिवीगाळ केली, त्यांच्या विश्वासार्हतेवर वक्तव्य केली. त्या सर्वांनी एम्सचा अहवाल समोर आल्यानंतर त्यांची बिनशर्त माफी मागायला नको होती का? गिधाड सिद्धांत व षडयंत्र घेऊन आले होते, त्यांनी आता लवकरच मानसिकदृष्ट्या चांगलं होण्याचा प्रयत्न केला पाहिजे,” अशी टीका प्रियंका चतुर्वेदी यांनी केली आहे.

सुशांतच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे दिल्यानंतर त्यांच्या शवविच्छेदन अहवालाची चौकशी करण्यासाठी एम्सची एक समिती नियुक्त करण्यात आली होती. सीबीआयने एम्स रुग्णालयाकडे पोस्टमॉर्टम तसंच व्हिसेरो रिपोर्टचा अभ्यास करण्याची विनंती केली होती. या अहवालात सुशांतची हत्या झालेली नाही, ती आत्महत्याच होती, असं म्हटलेलं आहे.

या ट्विटमुळे पडली होती वादाची ठिणगी

राम कदम यांच्या ट्विटवर बोलताना कंगनानं हे ट्विट केलं होतं. “सर…माझ्या काळजीसाठी धन्यवाद, पण खरंतर मला आता मुव्ही माफिया गुंडापेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटतेय…त्यामुळे हिमाचल सरकार किंवा थेट केंद्र सरकारनेच मला सुरक्षा द्यावी…पण मुंबई पोलीस नको प्लिज…”अशा आशयाचं ट्विट कंगनाने केलं होतं. त्यानंतर संजय राऊत यांनी कंगनावर टीका केली. राऊत यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना कंगनानं मुंबईची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी केली होती.