बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणूक तारखा जाहीर झाल्यानंतर बिहारमधील प्रचाराच्या मुद्यांवरून विरोधक-सत्ताधारी आमनेसामने येताना दिसत आहे. बिहार निवडणुकीत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मुद्दाही मांडला जात असताना दिसत असून, त्यावरून महाराष्ट्र सरकार व मुंबई पोलिसांवर टीका केली जात आहे. याच मुद्यावरून शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी निशाणा साधला आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर महाराष्ट्र-बिहार असा राजकीय संघर्ष दिसून आला. बिहारमधील राजकीय नेत्यांसह पोलीस अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र सरकार व महाराष्ट्र पोलिसांवर टीका केली. सुशांत सिंह प्रकरणात महाराष्ट्र सरकारसह पोलिसांच्या भूमिकेवर संशय उपस्थित केली होती.

बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते आमदार प्रताप सरनाईक यांनी ट्विट करून बिहार निवडणूक व सुशांत सिंह प्रकरणावरून टीका केली आहे. “बिहारच्या निवडणुकीचा निकाल, सुशांत सिंह केसचा निकाल व एनसीबीचा अहवाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार. तसेच अमेरिकेतील निवडणुका व कोविडची लस आहेच. त्यानंतर मात्र मुंबईवरचे प्रेम उफाळून येईल. तोपर्यंत ज्या व्यक्तींवर, कलाकारांवर आरोप होतील, त्यांनी चौकशीला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी,” असं सरनाईक यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- “बिहारमध्ये करोना संपलाय का?,” निवडणूक जाहीर झाल्याने संजय राऊत यांचा संतप्त सवाल

आणखी वाचा- करोना काळ असला तरीही बिहार पुन्हा जिंकणारच, देवेंद्र फडणवीस यांचा दावा

सध्या सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय करत असून, याच प्रकरणात ड्रग्ज सेवन प्रकरण समोर आलं होतं. त्याची चौकशी एनसीबीकडून सुरू असून, एनसीबीनं या प्रकरणी बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींना चौकशीसाठी समन्स बजावलं आहे.