28 September 2020

News Flash

“वृत्तवाहिनीवर मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख ऐकून शरद पवारांनी मला फोन केला अन्…”

संजय राऊत यांनी मीडिया ट्रायलबद्दल व्यक्त केली नाराजी

(संग्रहित छायाचित्र)

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण दिवसेंदिवस तापत चाललं आहे. या प्रकरणी बिहारमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाला वेगळं वळणं मिळालं. तर दुसरीकडे राजकीय नेत्यांकडूनही मुंबई पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सुशांत सिंह प्रकरण दिवसेंदिवस गूढ बनत चाललं आहे. मीडिया ट्रायलमुळे नवंनवे प्रश्न निर्माण होत असून, या संपूर्ण प्रकरणावरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपा, सीबीआय आणि मीडिया ट्रायलवर नाराजी व्यक्त करत फटकारलं आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी व्यक्त केलेल्या भूमिकेचाही राऊत यांनी हवाला दिला आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून केला जात असतानाच बिहार सरकारनं हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं. केंद्रानं सीबीआय तपासाला परवानगी दिली असून, महाराष्ट्र सरकारनं याला विरोध केला आहे. दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित सर्व घडामोडीमागे राजकारण असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी ‘रोखठोक’ सदरातून केला आहे. या प्रकरणात मीडिया ट्र्रायलमधून आदित्य ठाकरे यांचं नावही जोडण्यात आलं. त्यावरून राऊत यांनी निशाणा साधला आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

“महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार आहे. ते कसेही करून पाडायचे. पडत नाही म्हटल्यावर बदनाम करायचे असे विरोधकांनी ठरवले व भारतीय जनता पक्षाच्या सर्वच प्रकारच्या पाठिंब्यावर उभ्या राहिलेल्या वृत्तवाहिनीतून त्यांनी सुशांत प्रकरणात आघाडी उघडली. त्या वृत्तवाहिनीच्या प्रमुखाने केले ते ‘गॉसिपिंग!’ लोकांच्या मनातील संशय वाढवला. अर्णब गोस्वामी हे ‘रिपब्लिक’ वृत्तवाहिनीचे प्रमुख. ते राजकीय नेत्यांचा, मुख्यमंत्र्यांचा सरळ एकेरी भाषेत उल्लेख करतात, बदनामीकारक भाषा वापरतात, धमक्या देतात. सोनिया गांधींच्या बाबतीत त्यांनी हेच केले व आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी भाषेत उल्लेख करून आव्हानाची भाषा करतानाही त्यांना लोकांनी पाहिले. हे सर्व पाहिल्यावर शरद पवार यांनी मला फोन केला, ‘एका वृत्तवाहिनीवर उद्धव ठाकरे यांचा उल्लेख एकेरी भाषेत होतोय. हे बरोबर नाही. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री ही फक्त एक व्यक्ती नसते, तर संस्था असते.’ ‘Institute’ असा उल्लेख त्यांनी केला. शेवटी त्यांनी प्रश्न केला, ‘मग सरकार काय करते?’ पवार यांचे मत एका अनुभवी नेत्याचे मत आहे. पत्रकारितेचे हे चित्र चांगले नाही. एक वृत्तवाहिनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर एकेरी भाषेत गरळ ओकते व ते सहन केले जाते. त्या वृत्तवाहिनीस महाराष्ट्रातील राजकीय पक्ष बळ देतात. सुशांतसिंह हे निमित्त व त्या निमित्ताने सरकार बदनाम करायचे हे मुख्य कारस्थान. ते सुरूच आहे,” असं राऊत यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2020 2:03 pm

Web Title: sushant singh rajput suicide case sanjay raut told sharad pawar reaction about media trials bmh 90
Next Stories
1 डहाणूच्या समुद्रकिनाऱ्यावर एकाच दिवशी दोन मृतदेह आढळल्याने खळबळ
2 धक्कादायक! दहावीतील गुणवंत विद्यार्थीनीवर बलात्कार; व्यथित झाल्याने मुलीची आत्महत्या
3 वर्धा : ग्रामीण भागात बँकिंग व्यवहारांच्या सुलभीकरणासाठी महिला बचत गटांना संधी
Just Now!
X