News Flash

सुशीलकुमारांच्या अमृतमहोत्सव खर्चावरून सोलापूर तापले

भाजप-सेनेने शिंदे यांच्या सत्कारासाठी होणाऱ्या खर्चाला विरोध दर्शवत आंदोलन हाती घेतले आहे.

सुशील कुमार शिंदे (संग्रहित छायाचित्र)

पालिका तिजोरीतून दीड कोटी खर्च करण्यास भाजप-सेनेचा विरोध

सोलापूरचे सुपुत्र तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार सोहळ्यासाठी होणाऱ्या खर्चाला भाजप-शिवसेना युतीने विरोध दर्शविला असताना यात पालिका आयुक्त विजय काळम यांचीही भूमिका संभ्रम निर्माण करणारी असल्यामुळे शिंदे यांच्या अमृत महोत्सवी सत्कार सोहळ्याचा विषय गाजू लागला आहे. यात अप्रत्यक्षपणे शिंदे यांची मानहानी होऊ लागली आहे.

येत्या ४ सप्टेंबर रोजी सुशीलकुमार शिंदे यांचा अमृतमहोत्सवी सत्कार सोहळा सोलापूरच्या पार्क स्टेडिअमवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते होणार आहे. सोलापूर महापालिकेने आयोजिलेल्या या समारंभास काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींना निमंत्रित करण्यात आले आहे.

भाजप-सेनेने शिंदे यांच्या सत्कारासाठी होणाऱ्या खर्चाला विरोध दर्शवत आंदोलन हाती घेतले आहे. आमचा विरोध शिंदे यांच्या सत्काराला नाही तर त्यासाठी होणाऱ्या सुमारे दीड कोटीच्या खर्चाला असल्याचे पालिकेतील विरोधी पक्षनेते नरेंद्र काळे व भाजपचे शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांनी सांगितले. तर शिवसेनेने या मुद्दय़ावर शिंदे यांच्या सत्कारासाठी ‘भीक मागो’ आंदोलन सुरू केले आहे. माहिती अधिकार चळवळीचे कार्यकर्ते विद्याधर दोशी यांनीही या विषयाला तोंड फोडले.

पालिका प्रशासनाने शिंदे यांच्या सत्कारासाठी सुमारे दीड कोटी खर्चाचा प्रस्ताव तयार केला असून तो पालिका सभागृहाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे, परंतु आयुक्त काळम यांनी शिंदे यांच्या सत्कार सोहळ्यासाठी राष्ट्रपती येणार आहेत की नाही याबद्दलच संभ्रम निर्माण केला आहे. दरम्यान काँग्रेसनेही दीड कोटी एवढा खर्च करण्याच्या प्रस्तावाला विरोध करत तपशिलाची मागणी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2016 1:48 am

Web Title: sushil kumar shinde platinum jubilee issue
Next Stories
1 लैंगिक अत्याचार करणाऱ्या तिघांना बांदा येथे अटक
2 रायगड जिल्ह्य़ात स्वस्त तुरडाळ केंद्र 
3 ‘भरारी मराठी माणसाची’
Just Now!
X