‘वगैरे वगैरे’ शब्दाचा असाही घोळ

सत्ताकारणातील चार दशकांचा अनुभव घेतलेले देशाचे माजी गृहमंत्री व राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे हसतमुख चेहऱ्याचे रसिक राजकारणी म्हणून ओळखले जातात. साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात त्याचा वावर कायमचा आहे. मराठी सारस्वताच्या दरबाराशी जवळीक ठेवून असलेले शिंदे यांनी ‘वगैरे वगैरे’ या शब्दाचा अफलातून व तेवढाच रंगतदार किस्सा सांगून मंत्री आणि नोकरशहातील ‘आंबट’ गुपिताची पोलखोल केली तेव्हा सारेजणांची हसून हसून मुरकुंडी झाली.

पत्रकार संजय पाठक यांनी लिहिलेल्या ‘फेटे आणि फटकारे’ या पुस्तकाचे प्रकाशन शिंदे याच्या हस्ते झाले. राजकारण्यांना हळूच चिमटे आणि गुदगुल्या केलेल्या या पुस्तकावर भाष्य करताना शिंदे यांनी तेवढाच दिलखुलासपणा दाखविला. पुस्तकातील लेखनाचा धागा पकडून शिंदे यांनी एका मंत्र्याच्या बाबतीत घडलेला अफलातून किस्सा कथन केला. एक मंत्री महोदय जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर येणार होते. त्यामुळे मंत्री महोदयांच्या स्वीय्य सहायकाने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून सूचना दिल्या. मंत्री महोदय आपल्या जिल्ह्य़ात उद्या रात्री मुक्कामाला येणार असून त्याच्या सरबराईत जेवणाचा मेनू, झोपताना फळे आणि दुधाची व्यवस्था करा, अशा सूचना करताना शेवटी त्या स्वीय सहायकाने ‘वगैरे-वगैरे’ असा शब्द वापरला होता. ठरल्याप्रमाणे मंत्री महोदय रात्री साडेनऊच्या सुमारास शासकीय विश्रामगृहावर पोहोचले. स्थानिक नेते व कार्यकर्त्यांशी गप्पा मारून मंत्री महोदय बेडरूममध्ये पाय ठेवता तोच काय, तेथील बेडवर पदर घेऊन बसलेली अनोळखी बाई दिसली. हे पाहून ते क्षणभर चकितच झाले आणि त्यांनी लगेचच जिल्हाधिकाऱ्यांना पाचारण करीत, हा काय प्रकार म्हणून विचारणा केली. तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या ‘पीएं’नीच ‘वगैरे वगैरे’ची व्यवस्था करण्यास कळविले होते, असे उत्तर दिले. हा किस्सा शिंदे यांनी कथन करताच अवघे सभागृह हास्यात बुडाले.

अर्थातच हळुवारपणे हा गौप्यस्फोट करताना शिंदे यांनी ते मंत्री महोदय कोण होते? ते कोणत्या जिल्ह्य़ात आले होते? कोणत्या जिल्हाधिकाऱ्यांनी ‘वगैरे वगैरे’चा अर्थ असा अफलातून काढून तशी व्यवस्था केली, हे मात्र गुलदस्त्यातच ठेवले. इतकेच नव्हे तर त्या बाईला बेडरूममधून अखेर बाहेर काढले का? की ती तेथेच मुक्कामाला होती, याचे गुपितही त्यांनी उघड न करता झाकूनच ठेवले.