लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत देशासह महाराष्ट्रात काँग्रेस आघाडीची ‘वाट’ लागली असताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात काँग्रेसअंतर्गत धुसफूस सुरू झाली असतानाच सोलापूर लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झालेले पक्षाचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी राज्यात तूर्त तरी न येता नवी दिल्लीतच थांबणे पसंत केले आहे.
लोकसभा निवडणुकीत झालेल्या धोबीपछाडनंतर काँग्रेस पक्ष संघटनेच्या बांधणीची मोहीम लवकरच सुरू होणार असून यात आपण सहभागी होणार असल्यामुळे राज्याच्या राजकारणात परतण्याचा विचार नसल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. पक्षबांधणीच्या कामात पक्षश्रेष्ठींनी विशेष जबाबदारी सोपविल्यास ती पार पाडण्यास आपण तयार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
अलीकडे दोनतीन वर्षांत शिंदे यांनी राजकारणातून निवृत्त होण्याचा विचार दोनतीन वेळा बोलून दाखविला होता. यंदाची लढविलेली लोकसभा निवडणूकही शेवटचीच असल्याचेही त्यांनी म्हटले होते. परंतु काँग्रेसच्या विरोधात आलेली मोदी लाट शिंदे हे व्यक्तिश: रोखू शकले नाहीत. अ‍ॅड. शरद बनसोडे यांच्यासारख्या नवख्या उमेदवाराकडून त्यांना धक्कादायक पराभव सहन करावा लागला. या पाश्र्वभूमीवर संवेदनशील वृत्तीचे शिंदे हे पराभव अधिकच मनाला लावून घेतील व राजकारणातून निवृत्ती पत्करतील, अशी अटकळ तथा भीती राजकीय जाणकार व्यक्त करीत असताना त्यास शिंदे यांनी छेद देत राजकारणातून निवृत्ती न स्वीकारता उलट, राष्ट्रीय स्तरावर पक्षबांधणीच्या कामात गुंतवून घेण्याचे संकेत दिले. त्यामुळे सोलापूरच्या काँग्रेसजनांना किंचित दिलासा मिळाल्याचे दिसून येते.
सोलापूर लोकसभा निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल आपणास मान्य असून राजकारणात जय-पराजय होतच राहतात. त्यामुळे पराभवाने आपण खचलो नाही, तर पुन्हा जनतेची सेवा करण्यास तयार आहोत. न्यायालयातील चपराशी म्हणून काम करणाऱ्या आपणासारख्या एका दलित व्यक्तीला आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल ते केंद्रात ऊर्जामंत्री, गृहमंत्रिपद सांभाळण्याइतपत वाटचाल करण्याची संधी सोलापूरकरांनी दिली. या अगोदर दोन वेळा सोलापूर लोकसभेच्या खुल्या जागेतून माझ्यासारख्या दलित कार्यकर्त्यांला सोलापूरकरांनी विश्वास दाखवून निवडून पाठविले, याविषयीची कृतज्ञता कायम राहील. म्हणूनच पराभवाने खचून न जाता पुन्हा जोमाने कामाला लागणार असून येत्या २४ मे रोजी आपण सोलापूरकरांच्या भेटीला येत असल्याचे शिंदे यांनी सांगितले.