सोलापूर : सीबीआय, केंद्रीय गुप्तवार्ता, सर्वोच्च न्यायालय, रिझव्‍‌र्ह बँक, केंद्रीय दक्षता आयोग यासारख्या घटनात्मक स्वायत्त संस्थांवर राजकीय दबाव टाकून केंद्रातील भाजप सरकारकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न होत आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली.

सोलापुरात काँग्रेस पक्षाच्या वतीने ‘वॉर्ड चलो अभियान’ राबविण्यात येत आहे. सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील भवानी पेठेत घोंगडी वस्ती येथे या अभियानाचा प्रारंभ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी सभेत ते बोलत होते.

या प्रसंगी अक्कलकोटचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, पक्षाचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंबादास करगुळे, सुदीप चाकोते, संयोजक विवेक कन्ना आदी उपस्थित होते. या वेळी स्थानिक युवक कार्यकर्ते सुनील साहनी, योगेश सोलापुरे आदींनी आपल्या सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

शिंदे म्हणाले, की अनेक मोठमोठय़ा आश्वासनांसह सोलापुरातील वस्त्रोद्योगातील उत्पादित कापडाचा वापर देशातील पोलीस आणि जवानांच्या गणवेशासाठी करू आणि सोलापूरचा वस्त्रोद्योग विकसित करू, असेही आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील लोकसभा निवडणुकीवेळी दिले होते. ही सर्व आश्वासने सपशेल खोटी ठरली असल्याचा आरोप शिंदे यांनी केला.