News Flash

सुशीलकुमार शिंदे यांचे जीवन ही यशोगाथाच!

अमृत महोत्सवानिमित्त सत्कार

काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी. विद्यासागर राव आदी उपस्थित होते.

राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे गौरवोद्गगार; अमृत महोत्सवानिमित्त सत्कार

देशातील लोकशाहीच्या संवर्धनासह एकूणच विकासासाठी सुशीलकुमार शिंदे यांचे योगदान मोठे आहे. गरीब, मागासवर्गीय कुटुंबातील सामान्य तरुण प्रतिकूल आणि खडतर परिस्थितीत संघर्ष करीत आपली वाटचाल यशस्वी करतो. देशाची उल्लेखनीय सेवा करतो आणि त्यातून भारतीय संसदीय लोकशाही प्रगल्भ होते. शिंदे यांचे जीवन म्हणजे भारतीयांची यशोगाथाच आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी काढले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव सोहळा रविवारी दुपारी सोलापूरच्या पार्क स्टेडिअमवर झाला. त्यावेळी ते बोलत होते.

राष्ट्रपतींच्या हस्ते मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या पत्नी उज्ज्वला शिंदे यांनाही राष्ट्रपतींनी सन्मानित केले. सुमारे २५ हजार उपस्थितांच्या साक्षीने झालेल्या या सोहळ्याच्या व्यासपीठावर राज्यपाल सी. विद्यासागर राव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील, माजी केंद्रीय मंत्री कुमारी सेलजा, काँग्रेसचे नेते खासदार ज्योतिरादित्य शिंदे, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी गृहमंत्री पी. चिदंबरम आदी उपस्थित होते. शिंदे गौरव समितीचे अध्यक्ष डॉ. डी. वाय. पाटील यांनी प्रास्ताविक केले, तर आमदार प्रणिती शिंदे यांनी राष्ट्रपतींचे स्वागत केले.

दहा मिनिटांच्या भाषणात राष्ट्रपती मुखर्जी यांनी शिंदे यांच्या ४० वर्षांच्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव केला. शिंदे यांनी महाराष्ट्रात अनेक वर्षे मंत्रीपद सांभाळले व इतर अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या. उद्भवलेल्या परिस्थितीला खंबीरपणाने सामोरे जाताना त्यांनी प्रसंगी कठोर निर्णय घेतले. जीवनात संघर्ष करताना निराश न होता सदैव सकारात्मक दृष्टिकोन बाळगून मोठय़ा परिश्रमाने, जिद्द आणि चिकाटीने त्यांनी केलेली वाटचाल नव्या पिढीला प्रेरणा देणारी आहे, असे प्रशंसोद्गार राष्ट्रपतींनी काढले.

राज्यपाल विद्यासागर राव यांनीही शिंदे यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करताना आपल्या प्रसन्न आणि हसतमुख व्यक्तिमत्त्वामुळे ते वयाची शंभरी पार करतील, असा विश्वास व्यक्त केला. तर एक व्यक्ती किती असामान्य कार्य करू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे सुशीलकुमार शिंदे होय, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

शरद पवार यांनी शिंदे यांच्या राजकीय वाटचालीवर प्रकाश टाकताना काही जुन्या आठवणी सांगितल्या. पक्षाने दिलेली जबाबदारी त्यांनी मोठय़ा कौशल्याने सांभाळली. युनोमध्ये सोलापूरचे कर्तृत्व दाखविण्यात ते यशस्वी झाले, अशा शब्दात पवार यांनी शिंदे यांचा गौरव केला.

गौरवमूर्ती सुशीलकुमार शिंदे सत्काराला उत्तर देताना म्हणाले, ४० वर्षांच्या राजकीय जीवनात आपण कधीही वाढदिवस साजरा केला नाही. सत्तेत असतानाही वाढदिवस साजरा करणे टाळत होतो. परंतु अमृतमहोत्सवी वाढदिवस साजरा करण्याचा आग्रह मोडता आला नाही. ज्या सोलापुरात चप्पल-बूट नसताना तळपत्या उन्हामध्ये फिरलो, ‘बुढ्ढी का बाल’ विकत होतो, त्या सोलापुरात हा सत्कार राष्ट्रपतींच्या हस्ते होताना जीवन कृतार्थ झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

आता इकडे तिकडेबघायचे नाही

सुशीलकुमार शिंदे हे शरद पवार यांचा हात पकडून राजकारणात आले. त्यामुळे शिंदे यांना पवार हे गुरुस्थानी आहेत. पवार यांनी शिंदे यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकताना कोपरखळी मारली. आपण आणि सुशीलकुमार हे दोघे आता पंच्याहत्तरी पार केलेले आहोत. आता आपण दोघांनी वयाचा विचार करता यापुढे येणाऱ्या काळात थोडेसे जपून वागले पाहिजे, जुने दिवस संपले. आता इकडे-तिकडे बघायचे दिवस राहिले नाहीत, अशा शब्दात पवार यांनी सल्ला दिला. पवार हे मोठे विद्वान स्टॅटिस्टिक नेते आहेत, असे शिंदे म्हणाले. पवार यांच्या विधानाचा संदर्भ घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवार यांचा आदर्श घेण्याचा सल्ला शिंदे यांना दिला. पवार हे पंच्याहत्तरीनंतर दुप्पट ताकदीने जिल्ह्य़ा-जिल्ह्य़ात फिरत आहेत. ते आम्हाला लाभदायक नसले तरी त्यांनी अशीच सेवा करावी आणि शिंदे यांनीही पवारांप्रमाणे नव्या उमेदीने कामाला लागावे, अशा शब्दात फडणवीस यांनी सदिच्छा दिल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2016 12:44 am

Web Title: sushilkumar shinde story is story of india president pranab mukherjee
Next Stories
1 लांजाजवळ अपघातात २ जण ठार, १८ जखमी
2 शिक्षकांच्या तक्रारी समजूनच समायोजनेबाबत निर्णय
3 ‘अॅट्रॉसिटी’ समर्थक-विरोधकांचे नगरमध्ये २३ ला शक्तिप्रदर्शन
Just Now!
X