शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड रुग्णालयात ५० वर्षांच्या करोना संशयित रुग्णाने मफलरने गळफास घेतला. गुरुवारी मध्यरात्रीनंतर ही घटना घडली.

हा संशयित रुग्ण जामनेर तालुक्यातील पहुर येथील होता. बुधवारी रात्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. प्रतिजन चाचणीचा त्यांचा अहवाल नकारात्मक आला होता. याआधी त्यांना लक्षणे असल्याने पहुर येथे कोविड केअर केंद्रात दाखल करण्यात आले होते. तेथून त्यांना जिल्हा कोविड रुग्णालयात आणल्यावर करोना संशयित कक्षात दाखल करण्यात आले होते. नंतर त्यांची आरटीपीसीआर करोना चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल येणे बाकी होते. गुरुवारी दिवसभर रुग्णावर उपचार सुरू होते. रात्री १० ते १ या वेळेत परिचारिका, कक्षसेवक यांनी तीनवेळा त्यांना झोपण्याचा, जेवण्याचा सल्ला दिला. मात्र ते झोपले नाहीत. परिचारिकांना ते वारंवार का येता म्हणून विचारत होते. मध्यरात्री १२ च्यापुढे घोंगडे यांनी इतर रुग्ण झोपलेले असताना आणि कक्षात कोणी नसताना भांडार खोलीच्या दरवाज्याला मफलर टांगून आत्महत्या केली. काही वेळाने परिचारिका आल्यावर त्यांनी रुग्णाची शोधाशोध केली. त्यांना रुग्ण भांडार खोलीत लटकलेल्या अवस्थेत दिसला.

अहवाल नकारात्मक

शुक्रवारी सकाळी ११ वाजता संबंधित रुग्णाचा करोनाचा आरटीपीसीआर अहवाल हा नकारात्मक आला. सकाळी मयताच्या नातेवाईकांनी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांची भेट घेतली. नातेवाईकांना डॉ. रामानंद यांनी घटनाक्रम सांगितला. तसेच याप्रकरणी पोलीस चौकशी करीत असल्याची माहिती दिली.