राजकीय वरदहस्त लाभलेला सराईत गुन्हेगार मोहन चांगले आणि त्याचा साथीदार दीपक सोनवणे यांच्या हत्येप्रकरणी महापौरांचे भाऊ अ‍ॅड. राजेंद्र रघुनाथ वाघ ऊर्फ दादा वाघ याची सलग दुसऱ्या दिवशी चौकशी सुरू असली तरी या प्रकरणात गुरुवारी सायंकाळपर्यंत कोणालाही अटक झाली नाही. आदल्या दिवशी खुद्द पोलीस आयुक्तांनी संशयितांना २४ तासांत अटक करण्याचे आश्वासन मृताच्या नातेवाईकांना दिले होते.
नाशिकमध्ये सराईत गुन्हेगारांच्या अनेक टोळ्या कार्यरत असून वर्चस्वाच्या लढाईतून मंगळवारी रात्री एका टोळक्याने चढविलेल्या हल्ल्यात चांगले व सोनवणे यांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संतप्त झालेल्या चांगले समर्थकांनी महापौरांचे शासकीय वाहन आणि बसवरही दगडफेक केली होती. तसेच संशयितांना अटक होत नाही, तोपर्यंत चांगलेचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती. यावेळी पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी सर्व आरोपींना २४ तासांत अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर चांगले कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेतला. या हल्ल्यामागे महापौरांच्या भावाचा हात असल्याचा आरोप चांगले कुटुंबीयांनी करून तशी तक्रारही गंगापूर पोलीस ठाण्यात दिली आहे. या तक्रारीवरून महापौरांचे बंधू अ‍ॅड. राजेंद्र वाघ ऊर्फ दादा वाघसह गिरीश अप्पू शेट्टी, अर्जुन संपत पगारे, राकेश कोष्टी व व्यंकटेश मोरे या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अ‍ॅड. राजेंद्र वाघ यांची सलग दुसऱ्या दिवशी पोलिसांनी चौकशी केली. उर्वरित चार संशयित फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.