नाशिकच्या महात्मा गांधी रस्त्यावर एक संशयास्पद सुटकेस आढळून आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट उडाली. रस्त्याच्या कडेला एक बेवारस सुटकेस आढळून आल्यानंतर उपस्थितांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसर रिकामा केला आणि बॉम्बशोधक पथकाला पाचारण करण्यात आले. बॉम्बशोधक पथकाने केलेल्या तपासणी केल्यानंतर सुटकेस रिकामी असल्याचे आढळून आले.
दरम्यान, नाशिकमध्ये लाखोंच्या संख्येने भावीक कुंभमेळ्यासाठी दाखल झाले आहेत. एमजी रोड परिसर हा नदी पासून जवळ असून बाजार आणि वर्दळीचे ठिकाण असल्याने या बेवारस सुटकेसमुळे काहीकाळ परिसराट भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच पंजाबमधील गुरुदासपूरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातही अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर या शहरांमध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असून पोलीस यंत्रणांना सतर्क राहण्याचा इशारा गृह खात्याने दिला आहे.