शहराजवळील आसोदा येथे तमाशाच्या तंबूत जागेवरून वाद उद्भवल्याने उसळलेल्या दंगलीत गावठी बंदुकीतून गोळीबार करणाऱ्या मुंबई येथील निलंबित पोलिसासह अन्य संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.
आसोद्यात खंडेराव महाराजांचा यात्रोत्सव सुरू आहे. यात्रोत्सवात गुरुवारी रात्री तमाशा सुरू झाल्यावर साडेअकराच्या सुमारास उमेश महाजन, केतन भोळे व अन्य तरुणांचा एक गट पुढे बसत असताना रवींद्र देशमुखने त्यांना मज्जाव केला. त्यातूनच वादाची ठिणगी पडली. रवींद्र हा मुंबई येथे पोलीस शिपाई असून सध्या तो निलंबित असल्याने जळगाव शहरातच राहत आहे. रवींद्रने त्या तरुणांना हटकताच वादाला सुरुवात झाली. हे सर्व जण बस स्थानकाजवळ आले असता तेथे त्यांच्यात जोरदार हाणामारी झाली. त्यामुळे गावात अफवा पसरून काही भागात दगडफेक तसेच दुकानांची मोडतोड करण्यात आली. त्यावेळी एका गटाने गावातील विद्युत पुरवठा खंडित केल्याने कुठे काय चालले हे कोणालाच कळेना. बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांना समाजकंटकांवर नियंत्रण ठेवणे अशक्य झाल्याने त्यांनी जळगावहून अधिक कुमक मागविली.
दंगल सुरू असताना रवींद्रने गावठी बंदुकीतून गोळीबार केल्याचे सांगण्यात येते. दंगलीत उमेश महाजन, चेतन महाजन, केतन भोळे, दीपक वाणी व रवी बाविस्कर हे जखमी झाले. या प्रकरणी रवींद्र देशमुख यास अटक करण्यात आल्याचे उपअधीक्षक पंढरीनाथ पवार यांनी सांगितले.