मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करणा-या विनायक मेटे यांना नोटीस दिल्यानंतर त्यांच्यावरील निलंबनाच्या कारवाईला वेग आला आहे. दरम्यान, आपणास दिलेल्या नोटिशीचे उत्तर देणार असल्याची माहिती मेटे यांनी दिली. पक्षनेतृत्वाविरोधात कोणतीही कृती अथवा वक्तव्य सहन केले जाणार नाही, अशी भूमिका पक्षाच्या वरिष्ठांनी घेतल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.
मराठा समाजाला आरक्षण द्यावे की नाही, याचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीतील राष्ट्रवादीच्या एका सदस्याने सांगितले की, मराठा समाजाला आरक्षण देण्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस कधीच नव्हती. आर्थिक निकषांवर मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे, अशी भूमिका पक्षाची होती. राष्ट्रीय नेतृत्वाने म्हणजे शरद पवारांनी आरक्षणाच्या भूमिकेला पाठिंबाच दिला होता. मात्र, याच किंवा त्याच दिवसापर्यंतची मुदत टाकून एखादा नेता नाहक टीका करीत असेल तर त्याचे काय करावे?
नोटिशीला मेटे काय उत्तर देतात, यावर फारसे काही अवलंबून नाही. त्यांनी पक्षनेतृत्वावर टीका केल्याने त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशाच हालचाली सुरू झाल्या आहेत. या अनुषंगाने मेटे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, उद्या (गुरुवारी) शिवसंग्रामची बैठक होणार आहे. त्यात काय तो निर्णय घेतला जाईल. नोटिशीला उत्तर देणार आहे. गारपीटग्रस्त भागातील गावांच्या पाहणीसाठी शरद पवार जिल्ह्य़ाच्या दौ-यावर होते, तेव्हा मेटे यांची अनुपस्थिती होती. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होईल, अशी चर्चा सुरू होतीच. त्याला वेग आला आहे.