मालमत्ताकराबाबतच्या विशेष सभेत गोंधळ

पनवेल : विरोधकांनी मागणी लावून धरल्याने मालमत्ताकरासंदर्भात पनवेल महापालिका प्रशासनाने सोमवारी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. मात्र ही सभा ऑनलाइन असल्याने विरोधी पक्षातील नगरसेवकांनी थेट सभास्थळी येत गोंधळ घातला. त्यामुळे ही सभा तहकूब करीत गोंधळ घालणाऱ्या १५ नगरसेवकांचे निलंबन करण्यात आले. यात भाजपच्या एका नगरसेविकेचा समावेश आहे.

पनवेल पालिकेचे उत्पन्न कमी असल्याने पालिका प्रशासनाने शहराचा विकास होत नसल्याचे कारण पुढे करीत शहरातील मालमत्ताधारकांना कर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यात थकबाकीसह वसुली करण्यात येणार असून याला नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. या संदर्भात आंदोलनेही करण्यात आली आहेत. यानंतर पालिका प्रशासनाने समाविष्ट गावांना यातून वगळले असून सिडको वसाहतींना हा कर लागू करण्याचा निर्णय घेतला असून त्यांना विशेष नोटिसाही पाठविण्यात आल्या आहेत. येथील नागरिकांनी यावर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे पालिकेतील विरोधकांनीही याला विरोध करीत २२ मार्च रोजी पालिकेच्या सर्वसाधारण ऑनलाइन सभेत शेकाप व राष्ट्रवादीच्या सदस्यांनी घुसत सुरक्षा किट घालत आंदोलन केले. त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत ‘मालमत्ता कराबाबत भूमिका स्पष्ट करा, अन्यथा खुर्च्या खाली करा’ अशा घोषणा दिल्या. मालमत्ता कर लागू करण्याबाबत विशेष सभा घेण्याची मागणी केली. त्यावेळी आठ दिवसांत सभा घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

त्यानुसार पालिका प्रशासनाने सोमवारी ५ एप्रिल रोजी मालमत्ता कर आकारणीबाबत निश्चित केलेल्या करांचे दर आणि वाजवी वार्षिक भाडे मूल्य याबाबत निर्णय घेण्याबाबत ऑनलाइन सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र मालमत्ता करासारख्या महत्त्वाच्या विषयावर बाजू मांडता यावी म्हणून उपस्थितीचे आमंत्रण नसतानाही विरोधी पक्षाचे नगरसेवक सभागृहात हजर राहिले. महापौरांनी या नगरसेवकांना सभागृहाबाहेर जाण्याची विनंती केली. मात्र या नगरसेवकांनी गोंधळ घालत आमची बाजू ऐकावी अशी मागणी लावून धरली. त्यामुळे पोलिसांना सभागृहात बोलाविण्यात आले. पोलिसांनी विरोधकांची समजूत काढत त्यांना सभागृहाबाहेर काढले.

यांनतर ही विशेष सभा सुरू झाली. यात प्रशासनाने मालमत्ता कर प्रणालीची सविस्तर माहिती दिली. मात्र सभा सुरू होण्यास उशीर झाल्याने सभा तहकूब करण्यात आली, आता ही सभा मंगळवारी (६ एप्रिल) रोजी होणार आहे.

या नगरसेवकांचे निलंबन

ऑनलाइन सभेत परवानगी नसताना उपस्थिती दाखवत गोंधळ घातल्याने पनवेल महापालिकेतील १५ नगरसेवकांचे निलंबन करण्यात आले आहे. यात भाजपच्या नगरसेविका लीना गरड ,शेकापचे नगरसेवक गणेश कडू, शंकर म्हात्रे, गोपाळ भगत, रवींद्र भगत, ज्ञानेश्वर पाटील, राष्ट्रवादीचे नगरसेवक विजय खानावकर, विष्णू जोशी, डॉ. सुरेखा मोहोकर, प्रीती जॉर्ज म्हात्रे, प्रिया भोईर, उज्ज्वला पाटील, प्रज्योती म्हात्रे, कमल कदम, सारिका भगत आदी नगरसेवकांचा समावेश आहे.