रत्नागिरी : राज्यातील प्रमुख राजकीय पक्ष जागा वाटपाच्या चच्रेत अडकले असल्याचा फायदा घेत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नीलेश राणे यांनी गावपातळीवर सभांचा धडाका लावत प्रचारात आघाडी घेतली आहे.

पक्षाचे सर्वेसर्वा खासदार नारायण राणे यांनी गेल्या आठवडय़ात मुंबईत झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात नीलेश यांची या मतदारसंघातून उमेदवारी अधिकृतपणे जाहीर केली. त्या आधीपासूनच राणे पिता-पुत्रांनी रत्नागिरी शहर आणि तालुक्यावर विशेष लक्ष केंद्रित करत ठिकठिकाणी जाहीर सभांमधून शिवसेनेचे विद्यमान स्थानिक आमदार उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली. नीलेश यांनी तर शिवसेनाप्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या कारकिर्दीतील काही तथाकथित गैरप्रकार उघड करण्याची धमकी देत पक्षाच्या केंद्रीय नेतृत्त्वालाही आव्हान दिले.

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नीलेश यांनी ग्रामस्थांशी ’संवाद कार्यक्रम’ सुरू केला आहे. या मालिकेत रत्नागिरी तालुक्यातील मांजरे येथे सोमवारी झालेल्या सभेत त्यांनी संभाव्य शिवसेना-भाजप युतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, गेली साडेचार वर्षे भांडत राहिलेले आता युती करताहेत. एकमेकांचे तोंड ज्यांनी पाहिले नाही, ते एकत्र येतात. नक्की काय झाले समजले नाही, पण युती झाली तरीही आम्हाला काहीच फरक पडत नाही. रत्नागिरीने अवघ्या महाराष्ट्राला निलेश राणेची ओळख दिली.

कोकणावर सेनेचे विशेष लक्ष आहे, असे शिवसेना पक्षप्रमुखांकडून सांगितले जाते. पण गेल्या पाच वर्षांत खासदारांनी रत्नागिरीसाठी काय दिले ते माहिती नाही. जो खासदार सभागृहातच नव्हे तर मतदारसंघात दिसत नाही, ज्याला कोकणची माहिती नाही, जे मोदी लाटेत निवडून आले अशा विद्यमान खासदारांचे पार्सल घरी पाठवण्याची वेळ आली आहे. रत्नागिरीच्या आमदारांच्याही तीन टर्म झाल्या, म्हणजे चौदा वर्षांचा वनवास संपला. आता घरी पाठवायची वेळ आली आहे. रस्ता देतो असे सांगून मतदान मागितले. पण त्यांच्या यादीत हा रस्ता आहे की नाही, हे सांगू शकत नाही.

ही करपलेली भाकरी परतायची वेळ आली आहे. म्हणून येत्या लोकसभा निवडणुकीत संधी आपल्याला संधी देण्याचे आवाहन नीलेश यांनी केले.

यावेळी बाबू पाटील, विकास पाटील, राजन देसाई, भाऊ देसाई, अमर देसाई, अमित देसाई, संकेत चवंडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.