News Flash

शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, अन्यथा घरी बसा; खासदार शेट्टींचा पंतप्रधानांवर निशाणा

कर्जबाजारीपणाला शेतकरी जबाबदार नाहीत.

खासदार राजू शेट्टी. (संग्रहित छायाचित्र)

देशाची बदनामी होते म्हणून हजारो कोटी रुपयांची कर्जे बुडवणाऱ्या उद्योगपतींची नावे जाहीर केली जात नाहीत. सातव्या आयोगासाठी ३ टक्के नोकरदार वर्गाला वर्षाला १ लाख कोटींहून अधिक रुपयांची वाढ दिली जाते. पण शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे मोदी पुढील वेळी मते मागायला गेल्यास देशातील ६२ टक्के शेतकरी त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे कर्जमुक्ती द्यावी, अन्यथा घरी बसावे, असे म्हणण्याची वेळ येईल, असा इशारा स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारला दिला. पंढरपूरमध्ये कर्जमुक्ती परिषदेत ते बोलत होते. कर्जमुक्तीसाठी कुणासोबतही लढा देण्यास आपण तयार आहोत. देशभरातील सर्व शेतकरी संघटनांनी हा लढा उभारला असून, प्रसंगी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल, असेही ते म्हणाले.

पुढील लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी यांना शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा लागेल. अन्यथा त्यांना घरीच बसावे लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. देशातील सर्व शेतकरी संघटना कर्जमुक्ती आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याच्या मुद्द्यावर एकत्र आल्या आहेत. त्यामुळे हा निर्णय केंद्र सरकारला घेण्यास भाग पाडू, असा निर्धारही शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केला.

देशभरातील शेतकरी कर्जबाजारी होण्यास समाज आणि चंगळवादी लोक जबाबदार आहेत. वाढता चंगळवाद आणि औद्योगिकरण, तसेच वाढत्या प्रदूषणामुळे तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे निसर्गाचे चक्रच बिघडले आहे. शेतकरी पिकांचे उत्पादन घेतो. पण त्याचे दर ठरविण्यात सरकारकडून हस्तक्षेप केला जातो. कर्जे काढूनही त्याला नफा मिळत नाही. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होतो. त्याला शेतकरी जबाबदार नाही, असेही शेट्टी म्हणाले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2017 8:40 pm

Web Title: swabhimani leader mp raju shetty took a jibe on pm modi over farmers loan
Next Stories
1 मराठी भाषा विभागाचे पुरस्कार जाहीर, मारुती चितमपल्ली, यास्मिन शेख, शाम जोशी यांचा गौरव
2 मातीमोल भाव मिळाल्याने टोमॅटो रस्त्यावर
3 मधुकर पिचड हे आदिवासीच; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
Just Now!
X