बुलढाणा जिल्ह्यत आदेश असताना चारा छावण्या अजून सुरू झाल्या नाहीत. चारा छावण्यांसाठी निवेदने, उपोषण करण्यात आले, तरी प्रशासनाला जाग आली नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक होत गुरुवारी खामगाव येथे तहसीलदारांच्या कक्षात ‘झोपा काढो’ आंदोलन केले.

बुलढाणा जिल्हय़ात चाऱ्याचा तीव्र प्रश्न निर्माण झाला आहे. चाऱ्याअभावी असंख्य जनावरांचा मृत्यू झाला, तर काही कुपोषणग्रस्त झाले. अशा परिस्थितीमध्ये चारा छावण्या सुरू करणे आवश्यक आहे. या गंभीर प्रश्नाकडे शासन दुर्लक्ष करत असून, अद्यापही चारा छावण्या उभ्या केल्या नाहीत. चारा छावण्या कधी उभारता, असा जाब विचारण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकरी तहसील कार्यालयात दाखल झाले. परंतु, समाधानकारक उत्तर न मिळाल्याने चक्क तहसीलदारांच्या दालनात ‘झोपा काढो’ आंदोलन सुरू करण्यात आले. सर्वच     कार्यकर्ते व शेतकरी कार्यालयात झोपल्याने प्रशासनाचा गोंधळ  उडाला. जोपर्यंत चारा छावण्या मिळणार नाही, तोपर्यंत याच ठिकाणी झोपा काढू, असा इशारा स्वाभिमानी कडून देण्यात आला.