शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य दर मिळायालाच हवा. राज्य सरकारला जबाबदारी टाळता येणार नाही. शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटत चालला आहे. आता आंदोलन शेतकऱ्यांनी हातात घेतले असून देशद्रोहाचा खटला जरी भरला तरी माघार घेणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सोलापूर येथे दिला. कारखानदार आणि सरकारचे साटेलोटे असल्याचा आरोप करत सरकारला शेतकऱ्यांच्या रक्ताचा नैवेद्य हवा आहे काय, असा सवालही उपस्थित केला. सोलापूर येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात ऊस दरावरून विविध शेतकरी संघटना आक्रमकपणे आंदोलन करत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते बेमुदत उपोषणास बसले आहेत. या पार्श्वभूमीवर तुपकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. कारखानदार आणि लोकप्रतिनिधी यांची अभद्र युती असल्याचा टोलाही त्यांनी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे नाव न घेता लगावला.

कोल्हापूर, सांगली, सातारा, नंदूरबारचे ऊसदर मार्गी लागले आहेत. पण सोलापूर जिल्ह्यात सरकार कारखानदारांना पाठीशी घालत आहे. त्यांचे कारखानदारांशी साटेलोटे आहे. आजही आम्ही तडजोडीला तयार आहोत. पण सरकार निष्क्रिय आणि सर्वच पातळीवर अपयशी ठरल्याचे तुपकर म्हणाले. जिल्ह्यातील कारखानदार रिकव्हरी कमी दाखवतात, काटा मारतात, असा आरोप करत सरकारला जबाबदारी टाळून चालणार नाही. कुंपणच शेत खात आहे तर आम्ही बोलायचे कोणाला, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

कारखानदार कारखाने बंद करण्याची मस्तवाल भाषा करत आहेत. आम्ही आमचा ऊस सांगली, कोल्हापूर आणि कर्नाटकच्या कारखान्यांना घालू असेही त्यांनी म्हटले. शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटत चालला आहे. छातीवर गोळ्या झेलण्यासही ते तयार असून रक्तपात झाला तरी आंदोलन मागे घेणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच नगरची पुनरावृत्ती सोलापुरात होईल, असा इशाराही दिला.