पश्चिम महाराष्ट्रातील दूध संकलन थंडावले

पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध संकलन बंद आंदोलनाला सोमवारी पहिल्याच दिवशी पश्चिम महाराष्ट्रात मोठा प्रतिसाद मिळत सातारा, सांगली, कोल्हापूरसह सोलापूर जिल्ह्य़ात दूध संकलन ठप्प झाले होते. एकटय़ा कोल्हापूर जिल्ह्य़ातून मुंबईला जाणारे २० लाख लिटर दूध पुरवठा आज खंडित झाला. अनेक गावांत आज मोफत दूध वाटण्यात आले.

अडचणीत आलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्याला शासनाने मदत म्हणून प्रतिलिटरला पाच रुपये थेट अनुदान द्यावे, यासह अन्य मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी आजपासून आंदोलन सुरु केले. या आंदोलनास पश्चिम महाराष्ट्रात मोठा प्रतिसाद मिळाला.

राज्यातील सर्वात मोठय़ा गोकुळ (कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ) मध्ये आज संकलन झाले नाही. रोजचे सुमारे १२ लाख लिटर दूध आज गोकुळच्या गोकुळ-शिरगाव येथील कार्यालयात येऊ  शकले नाही. त्यामुळे येथे शुकशुकाट होता. सुमारे ५ कोटींचे नुकसान झाले.

कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. काल संकलन केलेले १० टँकर आज पोलीस बंदोबस्तात मुंबईला गेल्याचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी सांगितले.

जिल्ह्य़ातील वारणा आणि अन्य दूध उत्पादक संघांचेही तब्बल ८ लाख लिटर दुधाचे आज संकलन झाले नाही.

सांगलीत कार्यकर्त्यांची धरपकड

दूध बंद आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर सांगलीत सोमवारी पहाटेपासूनच काही कार्यकर्त्यांची धरपकड केली. त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता दिवसभर पोलीस ठाण्यात आणून बसवून ठेवण्यात आले. दरम्यान दूध आंदोलनामुळे जिल्ह्यतील १२ लाख लिटर दुधाचे संकलन होऊ शकले नाही. तर काही गावात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज ग्रामदेवतेला दुधाचा अभिषेक घालून शासनाला सुबुद्धी देण्याचे साकडे घातले. हे दूध वाटपाचे जागोजागी कार्यक्रमही घेण्यात आले होते. विशेषत शाळांमध्ये पोषण आहारासोबत मुलांना दूध वाटप करण्यात आले.

आजच्या या आंदोलनाला जिल्ह्यतील राजारामबापू, हुतात्मा, वारणा, सोनहिरा, मोहनराव िशदे, डोंगराई अशा सर्वच दूध संघांनी पाठिंबा देत दूध संकलन बंद ठेवले. सकाळच्या टप्प्यात डेअरी उघडय़ा नव्हत्या. चििलग प्लँटच्या वाहनांना रोखून दूध रस्त्यावर ओतण्याचा इशारा दिल्याने त्यांनी त्यांचे संकलन शंभर टक्के बंद ठेवले. त्यामुळे जिल्ह्यत आंदोलन शांततेच्या व सहकार्याच्या मार्गाने सुरू झाले.

सोलापुरात संकलन, पुरवठा ठप्प

सोलापूर जिल्ह्य़ातही आंदोलनाला प्रतिसाद मिळाला. माढा, सांगोला, बार्शी, मोहोळ, करमाळा आदी भागात दूध उत्पादकांनी दूधपुरवठा थांबवून ठिकठिकाणी देवदेवतांसह दुग्धाभिषेक करण्यात आले. रस्त्यावर दूधही सोडण्यात आले. तर काही ठिकाणी दुधाचे टँकर अडविण्यात आले. सातारा जिल्ह्य़ातील सर्वात मोठय़ा कोयनासह अन्य छोटय़ा संघांतर्फे आज दूध संकलन बंद ठेवण्यात आले होते.

नगरमधून २४ लाख लिटर दूध रोखले

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध दरवाढीसाठी सुरू केलेल्या आंदोलनाला आज खासगी व सहकारी दूध प्रकल्पांच्या चालकांनी एक दिवसाचा बंद पाळून पाठिंबा दिल्याने जिल्ह्यतून सुमारे २४ लाख लिटर दूध रोखण्यात आले असले, तरी पोलिसांनी ६० टँकर बंदोबस्तात मुंबईकडे रवाना केले. जिल्ह्यत सहा ठिकाणी रस्त्यावर दूध ओतून देण्यात आले. रात्री १२ वाजता जिल्ह्यतील विविध मंदिरात अभिषेक करण्यात आला असून सुमारे ३१९ पेक्षा अधिक कार्यकर्त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. शिर्डी येथील साईबाबांच्या मंदिरासमोर साईमूर्तीला अभिषेक करून घोषणा देणाऱ्या सहा कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली. तर सात जणांना स्थानबद्ध करण्यात आले. संगमनेरसह काही ठिकाणी स्थानिक लोकांना मोफत दूध वाटप करण्यात आले.

मराठवाडय़ातही आंदोलन

दूध उत्पादकांना अनुदान देण्याच्या मागणीवरून आक्रमक झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी औरंगाबाद, नांदेड, बीड जिल्ह्य़ात दूधफेक आंदोलन केले. नांदेड जिल्ह्य़ातील अर्धापूर तालुक्यातील मालेगावजवळ दूध वाहतूक करणाऱ्या एका ऑटोतील दूध रस्त्यावर सांडले, पार्डीजवळ दूध नेणारा टेम्पो फोडण्यात आला, निळा गावात राजहंसच्या गाडीची हवा सोडून आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यत अनेक ठिकाणी दूध संकलन केंद्रे बंदच होती. हे आंदोलन संपेपर्यंत कुणीही दूध संकलन करू नये, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. परंतु जबरदस्तीने कुणी दूध संकलन करण्याचा प्रयत्न केला, तर त्याचे परिणाम त्यांनाच भोगावे लागतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष प्रा. डॉ. प्रकाश पोपळे, जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले, हनुमंत राजेगोरे, किशनराव देळुबकर यांनी दिला आहे.

विठ्ठला, सरकारला सुबुद्धी दे – राजू शेट्टी

पंढरपूर – दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदानाच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाचा श्रीगणेशा पंढरपूर येथून झाला. येथील नामदेव पायरी येथे विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या प्रतीकात्मक मूर्तीवर दुग्धाभिषेक करण्यात आला. दूध उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्याची बुद्धी या सरकारला दे असे साकडे विठ्ठलाकडे घातले असल्याचे खा. राजू शेट्टी यांनी सांगितले.