बुलढाणा व वर्धेवरून काँग्रेससोबतच्या आघाडीचे घोडे अडले; ‘स्वाभिमानी’चा काँग्रेसला १३ मार्चपर्यंत ‘अल्टीमेटम’

प्रबोध देशपांडे, अकोला</strong>

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये महाआघाडी होण्यावरून तिढा कायम आहे. बुलढाणा आणि वध्रेच्या जागेवरून महाआघाडीचे घोडे अडले असून, स्वाभिमानी संघटनेने काँग्रेसला आता १३ मार्चपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. आघाडीचा निर्णय न झाल्यास राज्यातील १५ मतदारसंघ लढण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तयारी केली आहे.

गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला विरोध करून स्वाभिमानी शेतकरी संघटना केंद्रात ‘रालोआ’मध्ये तर, राज्यात महायुतीत सहभागी झाली होती. सत्तेत असतानाही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करून खासदार राजू शेट्टी यांनी भाजपविरोधात बंडाचा झेंडा हाती घेत काडीमोड घेतला. आता भाजपविरोधात समविचारी पक्षांची मोट बांधण्याचे काँग्रेसचे प्रयत्न आहेत. त्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोबत घेण्यासाठी काँग्रेस इच्छुक आहेत, तर स्वाभिमानीही त्यासाठी सकारात्मक आहे. मात्र, निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला तरी महाआघाडीचा निर्णय झाला नाही. संभाव्य महाआघाडीच्या घटक पक्षातील नेत्यांमध्ये चर्चेच्या फैरी झडल्या. या बोलणीमध्ये अंतिम तोडगा निघाला नाही. त्यामुळे अद्यापही महाआघाडीचा प्रश्न रेंगाळला आहे. स्वाभिमानीने हातकणंगले, माढा, बुलढाणा, सांगली, वर्धा आणि कोल्हापूर या राज्यातील सहा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले. त्यापैकी हातकणंगले, बुलढाणा आणि वर्धा मतदारसंघावर स्वाभिमानीचा दावा आहे, तर काँग्रेस-राष्ट्रवादीकडून केवळ हातकणंगले मतदारसंघ सोडण्याची तयारी असल्याची माहिती आहे. स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांना बुलढाण्यामधून राष्ट्रवादीच्या घडय़ाळ चिन्हावर लढण्याची ‘ऑफर’ देण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, त्यांनी त्याला नकार दिला. आता बुलढाणा आणि वर्धेच्या जागेवरून तिढा निर्माण झाला आहे. लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने काँग्रेसला निर्णय घेण्यासाठी स्वाभिमानी संघटनेने अल्टीमेटम दिला.

सत्ता परिवर्तनासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीत समावेश व्हावे, ही जनतेची इच्छा आहे. या संदर्भात काँग्रेसला प्रस्ताव दिला असून, अद्याप त्यांच्याकडून निर्णय घेण्यात आला नाही. १३ मार्चपर्यंत निर्णय न झाल्यास स्वाभिमानीच्या १५ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल.

– रविकांत तुपकर, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी पक्ष