केंद्रीय पथकाच्या पाहणी दौऱ्यावर राजू शेट्टी यांची टीका

सांगली : अवकाळी पावसाने खरीप पिकांचे नुकसान होऊन गेल्यानंतर आता रान मोकळे केले गेले त्यामुळे आता केंद्रीय पथक पाहणीसाठी दौऱ्यावर येऊन काय पाहणी करणार, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खा. राजू शेट्टी यांनी गुरुवारी सांगलीत पत्रकार बठकीत केला.

अवकाळीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून रानात पिके पाण्यात होती. त्यानंतर रब्बीसाठी रान मोकळे केले गेले. त्यामुळे आता पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाला काय दाखवणार असा सवाल  करून  शेट्टी म्हणाले, की पथकाने तत्काळ दौरा केला असता तर नुकसानीची पाहणी करणे सयुक्तिक ठरले असते. राज्यपालांनी जाहीर केलेली मदत अत्यंत तोकडी असून भरीव मदतीची गरज आहे. अवकाळी पावसानंतर राज्यात ६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून ही स्थिती भयावह आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदतीची गरज आहे. तसेच नुकसानग्रस्त शेतीसाठी मदतीचे निकषही बदलण्याची गरज आहे. शेडनेट, हरितगृह, बागायती द्राक्ष, डाळिंब यांचे आर्थिक नुकसान मोठे असून यासाठी मदतही जादा देण्याची गरज आहे.  पीक विमा कंपन्यांनी गेल्या ५ वर्षांत १२ हजार कोटींचा नफा कमावला असून शेती अडचणीत असताना या कंपन्या पळ काढत आहेत. शासनानेच आता विमा कंपनी स्थापन करून भागभांडवलासाठी अर्थ संकल्पात तरतूद करावी, फायदा झाला तर शासनालाच होईल असेही त्यांनी सांगितले.

‘महाशिव आघाडी’कडून संपर्क नाही

नव्या सरकारचे शेतीविषयक काय धोरण आहे हे पाहूनच पाठिंब्याबाबत आपण भूमिका घेणार असल्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. नव्या ‘महाशिव आघाडी’च्या स्थापनेबाबत आपल्याशी अद्याप कोणीही संपर्क साधला नसल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. राज्यात भाजपला सत्तेपासून बाजूला ठेवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीन पक्ष एकत्र येत आहेत असे दिसत असून या नव्या सरकारचा किमान समान कार्यक्रम काय आहे हे पाहावे लागेल, असे सांगून श्री. शेट्टी म्हणाले की, शेतकरी कर्जमाफी, वीज बिल, बेरोजगारी आणि शिक्षणाबाबत नव्या सरकारची काय भूमिका आहे? किमान समान कार्यक्रमात हे मुद्दे विचारात घेतले आहेत का? याबाबतचा अभ्यास करून पाठिंब्याबाबत आपण निर्णय घेऊ.