प्रशांत देशमुख, वर्धा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेला वर्धेची जागा देण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे रद्दबदली करणार असल्याच्या वृत्ताने काँग्रेस वर्तुळाची झोप उडाली आहे.

दरम्यान, या जागेवरील काँग्रेसच्या दावेदार चारुलता टोकस यांनी वध्रेची जागा काँग्रेस सोडणार नसल्याची हमी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी दिल्याचा दावा करीत प्रचारही सुरू केल्याचे स्पष्ट केले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीसोबत लढताना वर्धा, बुलढाणा व हातकणंगले या तीन जागांची मागणी केली आहे. या तीनही जागांसाठी संघटना नेते खासदार राजू शेट्टी अडून बसल्याच्या घडामोडी आहेत. त्यासाठी ४८ तासांचा अवधी काँग्रेसला देण्यात आल्यानंतर संघटना नेते रविकांत तुपकर यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेतली. वध्रेच्या जागेबाबत खासदार राहुल गांधी यांच्याशी बोलण्याचे आश्वासन त्यांनी तुपकर यांना दिल्याचे समजते. त्यावर चर्चेचे गुऱ्हाळ उठले.

काँग्रेसचा गड समजल्या जाणाऱ्या वर्धा लोकसभा मतदारसंघावर आज भाजपचा वरचष्मा आहे. महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष व काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार टोकस यांच्या मातोश्री प्रभा राव या येथून खासदार राहिल्या होत्या. त्यांचे व पवार यांचे राजकीय वैर सर्वश्रूतच राहिले. प्रभाताईंनी पवार यांच्यावर टीका करण्याची एकही संधी त्याकाळी सोडली नव्हती. राज्यात काँग्रेस आघाडीचे शासन असताना पवार  प्रभा राव यांच्यातील परस्परविरोधी टीकाही त्याकाळी गाजली. वध्रेची जागा ‘स्वाभिमानी’स देण्यासाठी खासदार पवार यांनी पुढाकार घेताच या राजकीय वैराला उजाळा मिळाला आहे. ‘आईचे उट्टे मुलीवर निघणार काय’, अशी प्रतिक्रिया एका ज्येष्ठ नेत्यांनी दिली.

या पाश्र्वभूमीवर बोलताना श्रीमती टोकस यांनी पवार यांनी घेतलेल्या पुढाकाराबाबत भाष्य करण्याचे टाळले. वध्रेची जागा काँग्रेसच लढणार. वाटाघाटीत अन्य पर्याय सुद्धा आहेत. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी माझे आज बोलणे झाले आहे. मी निश्चिंत आहे, असे मत श्रीमती टोकस यांनी व्यक्त करीत आपला जनतेशी संपर्क सुरू असल्याचे नमूद केले.

‘स्वाभिमानी’सोबतच्या वाटाघाटीत राकाँने त्यांच्या वाटय़ातील हातकणंगलेची जागा सोडली आहे. बुलढाणा ही जागाही राकाँकडेच आहे. त्यामुळे आता काँग्रेसने त्यांच्या वाटय़ातील जागा स्वाभिमानीसाठी सोडावी, असा युक्तिवाद होतो. नवी घडामोड म्हणजे वर्धेऐवजी सांगलीची जागा घेण्यास स्वाभिमानीने तयारी ठेवली आहे. सांगलीत आमदार विश्वजीत कदम यांचे नाव काँग्रेसतर्फे  चर्चेत आहे. मात्र, ते विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याने व अन्य सक्षम उमेदवार काँग्रसकडे नसल्याने वध्र्याऐवजी सांगली, असा बदल होण्याची संभावना व्यक्त होते.